चंद्रकांत पाटील यांचा टोला

कोल्हापूर : लखीमपूर घटनेनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बंदची हाक दिल्यावर त्यामध्ये सहभागी होण्याचे शिवसेनेच्या मनात नव्हते. अखेरच्या क्षणी पवारांच्या आवाहनाला साथ देत त्यात सहभाग नोंदवला. पवार यांनी निर्णय घ्यायचे आणि त्यामागे शिवसेनेने फरपटत जायचे असे चित्र दिसत आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे लगावला.

लखीमपूर घटनेनिमित्त राज्यात महाविकास आघाडीने बंदचे आवाहन केले होते. हा बंद फसला असल्याचे नमूद करून आमदार पाटील म्हणाले, लखीमपूर घटना अमानवी असल्याने तिचे समर्थन करता येणार नाही. केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलाला या प्रकरणी अटक केली आहे. तथापि या घटनेचा संबंध जोडून महाराष्ट्र बंद करणे चुकीचे आहे. राज्यात या गेल्या आठवड्यात प्राप्तिकराच्या धाडी पडल्या आहेत. त्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बंदचा राजकीय स्टंट केला आहे. राज्यातील आघाडी शासनाने महापूर, वादळ याची नुकसान भरपाई अद्याप जनतेला दिली नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याची भाषा उपमुख्यमंत्री करत आहेत. त्यांनी आता तरी कर्ज काढून आपदग्रस्तांना मदत करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

भीती दाखवून बंद

कोल्हापुरातील बंदकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यातील एका महान नेत्याने शिवसेना स्टाईलने बंद करण्याचे आवाहन केले. त्यातून या नेत्याच्या पक्षाची ताकद जिल्ह्यात नाही हेच दिसून आले आहे, असा टोमणा त्यांनी हसन मुश्रीफ यांना उद्देशून लगावला. शिवसेनेच्या ताकदीवर हे नेते मोठे होत आहेत. त्यांचा समाजात कसलाही प्रभाव नसल्याचेच दिसून आले आहे. भीती दाखवून बंद करण्यात आला, असा आरोप पाटील यांनी केला.