कोल्हापूर : साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक गर्दी करीत आहेत. रविवारी दिवसभरात सुमारे लाखभर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. जिल्ह्यातील पर्यटनस्थळी राबता वाढला आहे.

सध्या मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघ वगळता महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका झाल्यात. शाळा, महाविद्यालयांनाही सुट्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यासह बाहेरील भाविक आणि पर्यटक कोल्हापूरकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. रविवारी बाहेरून आलेल्या भाविकांची वाहने दसरा चौक, बिंदू चौक आणि मिरजकर तिकटी परिसरात वाहनांमुळं गर्दी झाली होती. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली होती.

हेही वाचा – कोल्हापुरात आंबेच आंबे; महोत्सवाला ४७ जातीचे आंबे सादर

हेही वाचा – कोल्हापुरातील रंकाळा तलावाची रया गेली; विद्रुपीकरण खंतावणारे

देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या पश्चिम बाजूच्या मुख्य दरवाजाजवळ भली मोठी रांग लागली होती. याठिकाणी उभारलेल्या शेडच्या बाहेरील बाजूपर्यंत कडक उन्हातही भाविकांची रांग होती. मुखदर्शनासाठी दक्षिण, उत्तर, पश्चिम बाजूच्या दरवाज्यातून भाविकांना प्रवेश दिला जात होता.