लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांना चंदगड मध्ये निर्णायक मताधिक्य मिळेल. चंदगड मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठी ताकद मिळाल्याने आता सुट्टी नाही, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. चंदगड विधानसभा मतदार संघात गेल्यावेळी वंचित कडू लढलेल्या अप्पी पाटील यांनी निर्णायक मते घेतल्याने निकाल वेगळा लागला होता. त्यांनी हजारों कार्यकर्त्यांच्या समवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी सतेज पाटील म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसने बंधुभावाचा, एकमेकांना मदत करण्याचा पाया रचला. गेल्या दहा वर्षांमध्ये धर्मांधर्मात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजपाने केले. या संघर्षाच्या काळात तुम्ही-आम्ही एकत्र येऊन शाहू महाराजांना दिल्लीमध्ये पोहोचवुया. माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, उमेदवार पाठिंबा मिळवण्यासाठी मतदाराच्या घरापर्यंत जात असतो. मात्र अप्पी पाटील जनतेलाच घेऊन आले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

आणखी वाचा-देव आला तरी मंडलिक यांचा पराभव अशक्य – हसन मुश्रीफ

अप्पी पाटील म्हणाले, राजकारण मी खूप जवळून पाहिले. सतेज पाटील यांच्या रुपाने उमदे नेतृत्व मिळाले असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सोमनाथ पाटील, गौतम कांबळे, फिरोज सौदागर, सोमगोंड आरबोळे यांनी चंदगड तालुक्यातून शाहू महाराजांना ५० हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Story img Loader