कोल्हापुरातील बडी घराणी निवडणुकीतील यशाने प्रकाशझोतात

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन लोकसभा विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत गेली.

election
(संग्रहित छायाचित्र)

|| दयानंद लिपारे

कोल्हापूर : राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाची कसोटी निवडणुकीला लागत असते. त्यातील जय-पराजयावर त्यांचे राजकारणातील अस्तित्व अवलंबून असते. कोल्हापूर जिल्ह्यातील बड्या घराण्यांची निवडणुकांमध्ये पराभवामुळे पिछेहाट झाली होती; त्यांना अलीकडे झालेल्या निवडणुकीतून प्रकाशझोतात येण्याची संधी मिळाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन लोकसभा विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत गेली. काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होऊन शिवसेना-भाजपचे स्थान भरभक्कम झाले. यात बड्या घराण्यांना जबर धक्का बसला.

२०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही कोंडी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यानंतर आमदारकी मिळवलेले सतेज पाटील यांनी फोडली. विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांना यश मिळाल्याने काँग्रेसला तेज आले आणि पाटील राजकीय पटलावर पुन्हा सक्रिय झाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने यश पुन्हा खेचून आणल्याने काँग्रेसचे वलय निर्माण झाले. सतेज पाटील हे निष्प्रभ होणार असे वाटत असताना त्यांनी पुतण्या ऋतुराज पाटील यांना विधानसभेत निवडून आणून घराण्यात तिसऱ्या पिढीचा आमदार बनवले. पुढे पालकमंत्री झाल्याने ते आणखी वलयांकित बनले.

घराण्यातील खासदारकी कायम

खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली. परंतु राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी त्यांचा पराभव केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी पराभवाचे उट्टे काढीत महाडिक यांच्यावर पावणेतीन लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. बाळासाहेब माने, निवेदिता माने यांच्यानंतर धैर्यशील माने यांच्या रूपाने खासदारकी परत तर आलीच, पण झाकोळलेल्या माने घराण्याला नवचैतन्य मिळाले.

आवाडे यांच्या घरात पुन्हा आमदारकी

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यानंतर मंत्रिपद, चार वेळा आमदार झालेले प्रकाश आवाडे हे सलग दोन विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे राजकीय वर्तुळातून दूर गेले होते. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसला रामराम करून अपक्ष निवडणूक लढवताना दणदणीत विजय मिळवून ते पुन्हा प्रकाशझोतात आले. माजी खासदार माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्यानंतर त्यांचे पुत्रही हरले होते. विधानसभा निवडणुकीच्या यशाने राजू ज. आवळे राजकारणात सक्रिय झाले.

सलग चार वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर यड्रावकर कुटुंबाला विधानसभा निवडणुकीत यशाचा गुलाल लागला. खेरीज, प्रथमच आमदार झाल्यानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पाच खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाल्याने आजवरचे अपयश भरून निघतानाच भक्कम राजकीय स्थान निर्माण झाले.

पाटील पितापुत्र केंद्रस्थानी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पी.एन.पाटील यांचा दीर्घकाळ वरचष्मा राहिला. गोकुळ, कोल्हापूर महापालिका, जिल्हा बँक अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचे अनेक वर्षे प्रभुत्व राहिले. पण सलग दोन विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांची पिछेहाट झाली.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद गेल्याने आणि गोकुळची निवडणूक ठरल्याने त्यांचे नेतृत्व क्षीण झाले. तथापि विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय खेचून आणला. तर आता जिल्हा परिषद निवडणुकीत अनपेक्षितपणे त्यांचे पुत्र राहुल पाटील यांनी मानाचे अध्यक्षस्थान मिळवले. यामुळे पी. एन. पाटील आण्णिे राहुल पाटील हे पिता-पुत्र  जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.

पन्हाळ्याच्या पायथ्याला पुनर्वसन

तात्यासाहेब कोरे यांच्यानंतर राजकीय पटलावर विनय कोरे यांनी प्रभाव निर्माण केला. विधानसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर ते युतीच्या काळात मंत्रीही बनले. पुढे जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली. पक्षाचा राज्यभर विस्तार करण्याच्या प्रयत्नात मूळच्या गडाकडे दुर्लक्ष झाले.त्यातून त्यांच्या आमदारकीला दोन वेळा सुरुंग लागला. गेल्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले आणि सहकारी संस्थांचा घसरणारा डोलारा सावरण्यातही त्यांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. माजी आमदार घराण्यातील गायकवाड व पाटील यांचे वारसदारही नव्याने चर्चेत आले आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील यशामुळे करणसिंह संजयसिंह गायकवाड आणि अमर यशवंतराव पाटील हे बड्या घरातील तरुण नेतृत्व अपयश झटकून राजकीय पटलावर चमकले आहे. जिल्हा परिषदेचे सभापतीपद मिळवत अमर पाटील यांनी पत्नी रसिका यांना मानाचे स्थान मिळवून देण्यात यश मिळवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Leadership test in the political arena political home background akp