कोल्हापूर : महाविकास आघाडीने सत्तेचा दुरुपयोग करून भाजपच्या नेतेमंडळींवर गुन्हा दाखल करण्याचे कपाटच उघडले आहे. खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याचे कारस्थान महाविकास आघाडी करत आहे, अशी टीका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीने यापूर्वी नारायण राणे, नितेश राणे, नीलेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. मात्र ते न्यायालयात टिकले नाहीत. चित्रा वाघ यांच्यावरील आरोपांना सामोरे जाण्यासाठी पक्ष व चित्रा वाघ समर्थ आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपचे हिंदूत्व हे बेगडी असल्याची टीका केली होती. याविषयी पाटील म्हणाले,की देशातील जनतेला हिंदूत्वासाठी भाजप, रा.स्व.संघ यांनी काय केले याची माहिती आहे. भाजपने स्थापनेपासूनच हिंदूत्वाच्या रक्षणाची भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्यावर मनसे ही भाजपची बी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीकडून केली जाते. यावर पाटील म्हणाले, राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे नेते आहेत.

त्यामुळे आघाडीच्या टीकेमध्ये काही अर्थ नाही. त्यांच्या हिंदूत्व, मशीद भोंगे या विषयाला आमचा पाठिंबा आहे. मनसेसोबत एकत्र येण्याबाबत ते म्हणाले, आमच्याकडे एक माणूस निर्णय घेत नाही. १३ जणांच्या राज्य कार्यकारिणीसमोर प्रस्ताव सादर होतो. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी निर्णय घेते.  मुख्यमंत्रिपदाचे फेविकॉल घट्ट असल्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असे वाटत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.