कोल्हापूर : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १२ घरफोड्यांचा गुन्हा गुरुवारी उघडकीस आणला. या प्रकरणी दोन आंतरराज्य सराईत गुन्हेगार व चोरीचा माल घेणाऱ्या तीन व्यक्तींसह पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले की, यापूर्वी सलीम शेख व त्यांच्या साथीदारांना अटक करून ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते. या दोघांच्या साथीदारांनी आणखी गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांचा मित्र दस्तगीर मुल्ला याच्या मदतीने सोने सराफाला विकल्याची माहिती मिळाली होती.
१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दस्तगीर महबूब मुल्ला याच्या मदतीने पूर्वा आझाद महालकरी (कोल्हापूर) यांच्याकडे चांदीचे तर तौफिक शेख याने सोन्या-चांदीचे दागिने सराफ संतोष मधुसूदन नार्वेकर (कोल्हापूर) यांच्याकडे दिल्याचे पोलीस अंमलदार अमोल कोळेकर यांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार या पाच संशयितांना ताब्यात घेतले असून १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १२६ ग्रॅम सोन्याचे दागिने, १७८ ग्रॅम चांदीचे व इतर मुद्देमाल असा सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.