‘बेळगाव मित्रमंडळ’कडून ४६ हजारांचा निधी

‘सर्व काय्रेषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमांतर्गत बेळगाव येथील सरस्वती वाचनालयाच्या कार्याची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास सहृदय वाचकांनी देणगीरूपाने भरभरून प्रतिसाद दिला. यात आता करवीरनगरीतील बेळगाव मराठी मित्रमंडळ नागरी सहकारी पतसंस्था व काही देणगीदारांनीही आपला हातभार लावला असून, त्यांनी यातून नुकताच ४६ हजारांचा निधी उभा केला आहे.

बेळगावमधील सीमाभागातील जनतेने मराठीशी आपली नाळ टिकवून ठेवली आहे. बेळगावातील सरस्वती वाचनालय हे त्याचे मूíतमंत उदाहरण. १४२ वर्षांचा समृद्ध इतिहास असलेल्या या वाचनालयाच्या वाचनसंस्कृतीची गाथा या वर्षी ‘लोकसत्ता’तील ‘सर्व काय्रेषु सर्वदा’ या उपक्रमात प्रसिद्ध झाली. संस्थेचे कार्य आणि आíथक निकड याची जाणीव झाल्याने अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. या संस्थेबद्दल हेच दु:ख करवीरवासीयांनाही जाणवत होते. सीमाभागाच्या कुठल्याही समस्येचे पहिले पडसाद कोल्हापुरात उमटतात, तसेच मदतीसाठीचे पहिले हातही याच शहरातून उभे राहतात. यातूनच इथल्या बेळगाव मित्रमंडळ नागरी सहकारी पतसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आणि पाहता पाहता यातून तब्बल ४५ हजार ७७७ रुपयांचा निधी उभा राहिला. या रकमेचा धनादेश  ‘लोकसत्ता’कडे सुपूर्द करण्यात आला.