यंत्रमाग उद्योगाच्या विविध मागण्यांसाठी ट्रेडींग असोसिएशनचे पदाधिकारी चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आज आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी संतप्त यंत्रमागधारकांनी ट्रेडींग असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्या घरावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

शासनाच्या दुर्लक्षामुळे यंत्रमाग उद्योग मोडकळीस आल्याने प्रलंबित मागण्यांसाठी मी स्वाभिमानी कारखानदार या संघटनेच्यावतीने बाळ महाराज आणि अमोद म्हेतर १७ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

आठ दिवसांच्या या उपोषणादरम्यान विविध आंदोलने करून आंदोलनाची तीव्रता वाढवली जात असली तरी स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी ट्रेडींगधारक मागण्यांबाबत चर्चा करण्यास ट्रेडींगधारक तयार नाहीत. त्यामुळे आंदोलकांनी ट्रेडींग असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांच्या घरावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज आंदोलनाच्या नवव्या दिवशी सकाळी कारखानदारांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढला.

मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर गांधी यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. मोर्चा काँग्रेस कमिटीसमोर आला असता पोलिसांनी मोर्चा बेकायदेशीर असल्याचे सांगत उगमचंद गांधी यांच्या घराकडे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

तरीही आंदोलकांनी रस्त्यात ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी सहकार्य न केल्यास आंदोलनकर्त्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. आंदोलनकत्रे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी धरपकड करून विकास चौगुले, गणेश शहाणे, राजू कोन्नुर, अमित ठोंबरे, अरिवद देवकर, प्रकाश म्हेतर, बाबासो शिरगुरे, राजू उरणे यांच्यासह ३९ जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही आंदोलनकत्रे गांधी पुतळा चौकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी परतले.

यावेळी बाळमहाराज यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. दरम्यान आंदोलनानंतर पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, सोमनाथ वाळकुंजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ट्रेडींग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून खर्चीवाल्यांच्या मजुरीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. मात्र चंदनमल मंत्री, घनशाम इनानी, अशोक बाहेती यांच्यासह ट्रेडींग चालकांनी मजुरीवाढ देण्यास असमर्थता दर्शवली.