कोल्हापूर : कोल्हापुरी शहरात गुरुवारी पावसाचे प्रमाण कमी राहिले.मात्र पुराची शक्यता वाढीस लागली आहे. शहराच्या काही भागांमध्ये पुराचे पाणी घुसू लागले असल्याने लोखंडी कठडे लावून या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोल्हापूर शहराला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या शिंगणापूर पाणंद, विवेकानंद हायस्कूल, गायकवाड घर, तोरस्कर चौक यासह अन्य काही भागांमध्ये पुराचे पाणी घुसू लागले आहे. पुराची चिन्हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने दक्षतेचा भाग म्हणून या सर्व मार्गावर महापालिका प्रशासनाने लोखंडी कठडे लावले आहेत. येथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

सुट्टी जाहीर करावी
जिल्हयामध्ये गेल्या आठवडयाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मुले पूराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे गुरुवारी एका पत्राद्वारे केली आहे.