सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उगम पावलेल्या आणि अवघ्या तीन महिन्यात २२ किलो वजनापर्यंत पोहचणार्‍या माडग्याळ मेंढीला आता स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून राष्ट्रीय संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे. माणदेशातील माळरानावर पोसलेल्या या मेंढीला आता संशोधनाने देशव्यापी मान्यता तर मिळाली आहेच, पण कमी पर्जन्यवृष्टीच्या भागातील अर्थकारणालाही गती देण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.

दुष्काळी भागातील शेतकरी आणि मेंढपाळांसाठी माडग्याळ मेंढी ही केवळ पशुधनाची जात राहिलेली नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारी महत्त्वाची संपत्ती बनली आहे. कमी पाणी, कडक उन्हाळा आणि उपलब्ध चार्‍यावर तग धरण्याची क्षमता, जलद वजनवाढ आणि चांगल्या दर्जाच्या मांसामुळे या मेंढीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, या जातीची क्षमता लक्षात घेता तिच्या संवर्धनासाठी शासनाकडून अपेक्षित असलेले धोरणात्मक पाठबळ अद्याप अधिक व्यापक होण्याची गरज आहे.माडग्याळ मेंढीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची जलद वजनवाढ. जन्माच्या वेळी साधारण तीन ते साडेतीन किलो वजनाचे असलेले कोकरू योग्य संगोपन आणि आहार मिळाल्यास अवघ्या तीन महिन्यांत २० ते २२ किलोपर्यंत वजन गाठते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन ४५ ते ५० किलोपर्यंत जाते. त्यामुळे तुलनेने कमी कालावधीत विक्रीयोग्य वजन मिळत असल्याने मेंढपाळांना आर्थिक फायदा होतो.

प्रतिकूल हवामानातही टिकणारी जात

सांगली, सोलापूर आणि परिसरातील दुष्काळी पट्ट्यात पशुपालन करताना पाण्याची उपलब्धता आणि चारा ही मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत माडग्याळ मेंढीची प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. कमी पाणी आणि कडक उन्हातही ही जात तग धरू शकते. त्यामुळे मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या पशुपालकांसाठी माडग्याळ मेंढीपालन हा व्यवहार्य व्यवसाय ठरू शकतो. या मेंढ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने इतर काही जातींच्या तुलनेत आजारपणाचे प्रमाण कमी असल्याचा पशुपालकांचा अनुभव आहे. मात्र, रोगप्रतिकारक क्षमता चांगली असली तरी नियमित लसीकरण, स्वच्छता, संतुलित आहार आणि पशुवैद्यकीय तपासणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पैदाशीसाठी नरांना लाखोंची मागणी

माडग्याळ मेंढ्यांच्या आकर्षक शरीरयष्टीमुळे उत्कृष्ट गुणवत्तेच्या नरांना पैदाशीसाठी विशेष मागणी असते. बाकदार नाक, उंच पाय, मजबूत बांधा आणि चांगली वंशावळ असलेल्या नरांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे माडग्याळ मेंढीपालनात मांस उत्पादनाबरोबरच शुद्ध पैदास हा स्वतंत्र आणि फायदेशीर व्यवसाय मांसाबरोबरच लेंडीखत, लोकर आणि दूध यांसारखी उपउत्पादनेही मिळतात. शेतीमध्ये लेंडीखताचा वापर करता येत असल्याने शेती आणि मेंढीपालन यांची सांगड घालून उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण करता येते.

शुद्ध पैदास केंद्रे उभारण्याची मागणी

माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने तिच्या संवर्धनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. मात्र शुद्ध जातीच्या मेंढ्यांची उपलब्धता, दर्जेदार नरांची पैदास आणि आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर यासाठी संस्थात्मक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी माडग्याळ मेंढीपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तालुकानिहाय शुद्ध पैदास केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे. कृत्रिम रेतनासाठी सिमेन बँक स्थापन केल्यास उत्कृष्ट वंशावळीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करता येईल. महाराष्ट्रातील अन्य दुष्काळी भागांतही या जातीचा विस्तार करण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरू शकते.

तरुणांना व्यवसायाकडे वळविण्याची संधी

शेतीतील वाढते खर्च आणि अनिश्चित उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण तरुणांना पर्यायी व्यवसायाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने माडग्याळ मेंढीपालन व्यावसायिक पद्धतीने करता येते. शेड व्यवस्थापन, पोषण, पैदास, आरोग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन याबाबत प्रशिक्षण दिल्यास हा व्यवसाय सुशिक्षित तरुणांसाठीही आकर्षक होऊ शकतो.राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून शेड बांधणी, पशुधन खरेदी आणि व्यवसाय विस्तारासाठी कर्ज व अनुदान उपलब्ध करून देण्याबरोबरच माडग्याळ मेंढीपालकांसाठी विशेष योजना राबविण्याची गरज आहे.

बाजारपेठ पारदर्शक होणे गरजेचे

उत्पादन वाढविण्याबरोबरच मेंढ्यांना योग्य बाजारभाव मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. सांगलीतील माडग्याळ बाजारासारख्या स्थानिक बाजारांचे आधुनिकीकरण करून पारदर्शक वजनकाटे आणि डिजिटल लिलावाची व्यवस्था करावी. वजन, वय, जात, शरीरयष्टी आणि दर्जानुसार दर ठरविण्याची पद्धत विकसित केल्यास पशुपालकांची फसवणूक कमी होऊ शकते.

मांसाला योग्य दर मिळण्यासाठी बाजारव्यवस्थेत पशुपालकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. बाजारभावाची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध झाल्यास व्यापारी आणि पशुपालक यांच्यातील व्यवहार अधिक पारदर्शक होऊ शकतात.

विमा आणि आरोग्य संरक्षण आवश्यक

मेंढ्यांना लाळ्या-खुरकूत, घटसर्प यांसारख्या रोगांचा धोका असतो. त्यामुळे गावागावात वेळेत मोफत लसीकरण आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्ती, रोग किंवा अपघातामुळे मेंढ्या दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे सुलभ, कमी खर्चाची आणि जलद नुकसानभरपाई देणारी पशुविमा योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

चराई क्षेत्रांचे संरक्षण

मेंढीपालन टिकविण्यासाठी चार्‍याची उपलब्धता हा कळीचा मुद्दा आहे. पारंपरिक फिरस्त्या चराई व्यवस्थेला योग्य नियोजनाची जोड देऊन उपलब्ध गायरान आणि इतर योग्य चराई क्षेत्रांचा वापर मेंढपाळांना करता यावा. दुष्काळाच्या काळात चारा छावण्यांमध्ये मेंढ्यांसाठी स्वतंत्र आणि पौष्टिक खाद्याची व्यवस्था करणेही आवश्यक आहे.

माडग्याळला ब्रँड बनविण्याची संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून माडग्याळ मेंढीच्या संवर्धनासाठी एकात्मिक योजना राबविली तर या जातीला व्यापक बाजारपेठ मिळू शकते. शुद्ध पैदास, सिमेन बँक, पशुवैद्यकीय सुविधा, विमा, अनुदान, चारा व्यवस्थापन आणि बाजारपेठ या सर्व बाबी एकाच धोरणात आणणे आवश्यक आहे.माडग्याळ मेंढी ही दुष्काळी भागातील शेतकरी आणि मेंढपाळांसाठी आर्थिक स्थैर्याचे साधन बनू शकते. शासनाचे धोरणात्मक पाठबळ, आधुनिक पशुपालन तंत्र आणि पारदर्शक बाजारव्यवस्था यांची सांगड घातल्यास माडग्याळ मेंढीपालन ग्रामीण महाराष्ट्रातील शाडत आणि रोजगारनिर्मिती करणारा व्यवसाय ठरू शकतो.

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकनेही या माडग्याळी मेंढीवर हक्क सांगितला होता. मात्र, संशोधक अधिकार्‍यांना जत तालुययातील सिध्दनाथ खोरे परिसरातील भौगोलिक वातावरणात जतन केलेल्या शुध्द देशी जातीच्या मेंढीचे पुरावे उपलब्ध करून देण्यात आले. माणदेशातील जत, आटपाडी, सांगोला भागात या मेंढीच्या शुध्द बीजाचे जतन पशूपालक करत आहेत. हे सिध्द करण्यात यश आले. यामुळेच देशी जात म्हणून मान्यता मिळाली. यासाठी निवृत्त पशू अधिकारी डॉ.व्यंकटराव घोरपडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले- डॉ. अजयनाथ थोरे, उपायुक्त पशूसंवर्धन, सांगली.