महा विकास आघाडी, बेळगाव मधील एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी
कोल्हापूर : सीमा भागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला असतानाही आंदोलन सुरू झाले आहे, हे वैशिष्ट्ये. आंदोलनात सीमा भागातील एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांनी जत तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील गावांवर कर्नाटकचा हक्क सांगितला असल्याने महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूर मध्ये राजर्षी शाहू महाराज स्मारक येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सतेज पाटील ,हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील या आमदारांसह शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधावडकर सहभागी झाले आहेत.
सीमावासियांना पाठबळ देण्यासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन आयोजित केले आहे, असे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कर्नाटक सरकार जबाबदार
कर्नाटक विधानसभा निवडणुकी मध्ये भाजपला सत्ता गमवावी लागणार असल्याचा अंदाज आला आहे. त्यामुळे सीमाभागा बद्दल काहीही बोलून लोकांची नजर दुसरीकडे नेण्याचा डाव आहे, असा त्यांनी आरोप केला.