कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना थोपवण्यासाठी जनता दल, भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती पक्ष असे सारेच घटक एकत्रित आले आहेत. व्यक्ती विरोधातील लढा असे गडहिंग्लजच्या गडाच्या लढतीला स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे येथे राजकीय विचारांना तिलांजली देत समीकरणे घडू लागली आहेत.

गडहिंग्लज हा जनता दलाचा राज्यातील एकमेव उरलेला गड अशी स्थिती आहे. येथे जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी यांनी जनता दलाचे ढासळते बुरुज टिकवून ठेवले आहेत. यामुळे येथे कोरे यांच्याशी हात मिळवणी करण्यासाठी सर्व पक्ष उत्सुक आहेत. त्याला कारण ठरले आहे ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना येथे रोखणे.

गडहिंग्लज नगरपालिकेसाठी अनुसूचित जमाती करिता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आहे. यामुळे येथे सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. गडहिंग्लज पालिका ही मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी पालिका. मुश्रीफ यांना येथे पालिका निवडणुकीत आवर घातला की पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मार्गात काटे पेरणे सोपे जाणार असल्याची अटकळ त्यांच्या तमाम विरोधकांनी बांधली आहे. त्यातूनच गडहिंग्लज या राजकीय प्रयोगाची पहिली रंगभूमी ठरली आहे.

चंदगडची प्रतिक्रिया

हसन मुश्रीफ यांनी चंदगड नगरपालिका निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही टोकाचे पक्ष एकत्रित आणले. या चालीस मात देण्यासाठी म्हणून गडहिंग्लज मध्ये घडामोडी घडत आहेत. चंदगडचे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील लगेचच गडहिंग्लज मध्ये डेरेदाखल झाले. त्यांनी स्वाती कोरी यांना भाजपचे पाठबळ दर्शवले. अर्थात, गडहिंग्लज शहरात शिवाजी पाटील यांचा प्रभाव तसा अदखलपात्र; तरीही केवळ मुश्रीफ यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करणे , त्यांना डीवचणे इतकाच उद्देश. महायुती मधील भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात चंदगड आणि गडहिंग्लज पालकांमध्ये मध्ये दंड थोपटून उभे आहेत.

दोन्ही सेना एकत्र

काँग्रेसचे विधान परिषद गट नेते सतेज पाटील, जन सुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार विनय कोरे यांनीही जनता दलासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हसन मुश्रीफ विरोध या न्यायाने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजित घाटगे नव्या आघाडी सोबत राहणार आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हेही या नव्या आघाडीमध्ये खांद्याला खांदा लावून सोबत करणार आहेत.

जनता दलही भाजपबरोबर

जनता दलाचे आजवर भाजप सारख्या जातीयवादी पक्षापासून फटकून राहण्याची भूमिका कायम घेतली आहे. मात्र आता गडिंग्लज मध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहेत. अशीच स्थिती शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या पक्षाबाबतची. कोकणात हे दोन्ही गट एकत्रित येताना दिसत आहेत. त्याचीच पुनरावृत्ती गडहिंग्लज मध्ये होणार असे दिसत आहे.