सातारा: मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील एका अनधिकृत मशिदीच्या पाडकामावेळी या कारवाईस पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीस धमकी प्रकरणाचा तपास करताना महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाचे थेट पाकिस्तानशी संबंध उघडकीस आले आहेत. मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९, रा. महाबळेश्वर) असे संबंधिताचे नाव असून त्यास मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने शनिवारी अटक केली आहे. त्याचे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील एक अनधिकृत मशीद नुकतीच पाडण्यात आली. या कारवाईस प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांनी पाठिंबा दर्शवला होता. यानंतर खत्री यांना २१ मे पासून आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून सातत्याने धमक्या येत होत्या. याबाबत त्यांनी २२ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा तपास करताना वरील प्रकार उघडीस आला आहे.
पोलिसांच्या या तपासादरम्यान संशयित आरोपी शफीकची अत्यंत संवेदनशील दहशतवादी पार्श्वभूमी समोर आली आहे. त्याचे वडील आणि दोन मोठे भाऊ सध्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे वास्तव्यास आहेत. त्याचा एक भाऊ २०१९ मध्ये पाकिस्तानात गेला असून, तो ‘लष्कर-ए-तोयबा’ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेत कमांडर पदावर कार्यरत असल्याची माहितीदेखील या तपासात पुढे आली आहे. धमक्यांचे हे दूरध्वनी, संदेश शफीक याच्या मोबाइलमधून येत असल्याचे पुरावेदेखील पोलिसांना मिळाले आहेत.
दरम्यान चौकशीत शफीकने ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी समाज माध्यमावरून संपर्क केल्याचे पुढे आले आहे. याशिवाय काही संशयास्पद व्यवहार झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी शफीककडून दोन मोबाइल व एक डायरी जप्त केली आहे. त्याने उडवलेला मजकूर पुन्हा प्राप्त करण्यासाठी पोलिसांनी या विषयातील तंत्रज्ञांची मदत घेतली आहे. या तपासातून यामध्ये आणखी कोम सहभागी आहेत ते शोधले जाईल.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३९ वर्षीय मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक करण्यात आली आहे. त्याचे पाकव्याप्त काश्मीरमधील ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेसोबत थेट संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील सखोल चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. – सुनील साळुंखे, पोलीस उपाधीक्षक, वाई विभाग
