सातारा: महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत शतकातील विक्रमी अशा तब्बल ५१३ मि.मी. (२० इंच) पावसाची नोंद झाली आहे. झोडपून काढणाऱ्या या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत जमीन, रस्ते खचले आहेत. पुणे ते महाबळेश्वरसह अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने, तसेच दरडी कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्ते बंद, झाडे उन्मळून पडणे, जमीन खचणे, वीजपुरवठ्याअभावी अंधार यामुळे जनजीवन पूर्णतः कोलमडले आहे.

महाबळेश्वर परिसरात १ जूनपासून आजवर एकूण १७१७.४० मि.मी. (६७ इंच) पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचे जोरदार आगमन झाल्यावर यात मोठी भर पडलेली आहे. त्यामध्ये कालपासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे.

सततच्या पावसामुळे वेण्णा नदीवरील लोखंडी पूल खचून तीन वाहने थेट नदीपात्रात कोसळली. नगरपालिका प्रशासनाने तातडीने क्रेनच्या साहाय्याने ही वाहने बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. मुख्य रस्ते आणि वेण्णा लेक परिसरात तळ्याचे स्वरूप आले असून बगीचा कॉर्नरनजीक वाहतूक मंदावली आहे. ग्रामीण भागातील घावरी-येरणे रस्ता खचल्याने व सोळशी नदीला पूर आल्याने येरणे खुर्द, बुद्रूक आणि आचली या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. प्रतापगड रस्त्यावरील ऐतिहासिक जन्नी माता मंदिराजवळील घाटाचा कडा खचल्याने वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे.

तालुक्यात वीज आणि मोबाइल सेवा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. मोरणी येथे झाड कोसळल्याने तरुणांनी वनविभागाच्या असहकार्याविरुद्ध संताप व्यक्त करत स्वतः रस्ता मोकळा केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीची आढावा बैठक घेऊन ‘एनडीआरएफ’सह सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदार सचिन म्हस्के आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महाबळेश्वर परिसरातील पावसामुळे वेण्णा नदीवरील लोखंडी पूल (वेण्णा लेकजवळ) – पुलाचा काही भाग खचल्याने पुलावर उभी असलेली तीन वाहने नदीपात्रात कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वेण्णा लेक व शहरातील मुख्य रस्ते – मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम. महाबळेश्वर–पाचगणी मार्ग (बगीचा कॉर्नर) – रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली. ग्रामीण भागातील अनेक रस्ते – रस्ते खचले, मातीचे ढिगारे व दगड आल्याने अनेक घाटरस्ते बंद पडले आहेत.

घावरी–येरणे रस्ता – रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाला आहे. सोळशी नदी परिसर – पुरामुळे येरणे खुर्द, येरणे बुद्रूक आणि आचली या गावांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वर–प्रतापगड मार्ग (हारोशी गावाजवळ, जन्नी माता मंदिर परिसर) – घाटाच्या कडेला रस्ता खचल्याने मार्ग धोकादायक बनला आहे. मोरणी गावात महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित. वीज नसल्याने गावागावांतील पाणीपुरवठा योजना बंद. मोबाइल व इंटरनेट सेवा बंद पडल्याने संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

– जनजीवन विस्कळीत

– संपूर्ण तालुका अंधारात

– पूल खचल्याने वाहने नदीत

– प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा