सातारा : जागतिक कीर्तीच्या पर्यटननगरी महाबळेश्वरला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने महाबळेश्वर व पाचगणी शहरांचा प्रमुख जलस्रोत असलेला वेण्णा तलाव रविवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला.
धरणात केवळ ५० ते ५२ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने महाबळेश्वर आणि पाचगणी पालिका क्षेत्रासह परिसरातील २५ गावांवर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र, जुलैच्या सुरुवातीलाच वरुणराजाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे अवघ्या काही दिवसांत ५६ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेला हा तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. यामुळे दोन्ही शहरांचा वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
वेण्णा तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या वेगाने वाहणारे पाणी वेण्णा नदीपात्रात दाखल झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यामुळे ऐतिहासिक लिंगमळा शेती परिसर जलमय झाला आहे. शेतजमिनी आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. परिसरात निसर्गाचे देखणे आणि मनोहारी रूप अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान, महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेला लिंगमळा धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रचंड वेगाने दरीत कोसळू लागला आहे. फेसाळणाऱ्या पाण्याचा शुभ्र धबधबा, दाट धुके आणि हिरवागार निसर्ग यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वेण्णा तलाव परिसर, लिंगमळा आणि विविध पर्यटनस्थळांवर वीकेंडचा लाभ घेत पर्यटकांनी मोठी उपस्थिती लावली असून पावसात चिंब भिजण्याचा आणि सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला.
पाऊस आणि वेण्णा लेकच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांनी या भागात मोठी गर्दी केली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुसळधार पावसादरम्यान बोटींग तात्पुरते बंद ठेवण्यात येत असले, तरी तलावाच्या काठावर गरमागरम मका खात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वेण्णा लेककडे वळत आहेत.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. दाट धुके, साचलेले पाणी आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागली.
महाबळेश्वर हवामान विभागाच्या माहितीनुसार, १ जून ते ५ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तालुक्यात १ हजार २०४ मिमी (सुमारे ४७ इंच) पावसाची नोंद झाली आहे. तसेच रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या अवघ्या नऊ तासांच्या कालावधीत १०० मिमी (सुमारे ४ इंच) इतका मुसळधार पाऊस कोसळला.
सततच्या दमदार पावसामुळे संपूर्ण महाबळेश्वर परिसर हिरवाईने नटला असून डोंगरकपाऱ्यांतून कोसळणारे असंख्य छोटे-मोठे धबधबे, तुडुंब भरलेला वेण्णा तलाव आणि धुक्याने वेढलेले निसर्गरम्य वातावरण यामुळे महाबळेश्वरचा पावसाळी पर्यटन हंगाम आता खऱ्या अर्थाने बहरात आला आहे.
