कोल्हापूर : दुग्ध विकास मंत्रीपदी असताना मौन बाळगलेल्या महादेव जानकर यांनी कोल्हापुरात येऊन एक धडाकेबाज गौप्यस्फोट केला आहे. गोकुळ दूध संघाला बहुराज्य दर्जा देण्यासाठी मला २०० कोटी रुपयांची ऑफर होती, असे खळबळ जनक विधान जानकार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची उलट सुलट चर्चा होत असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जानकर यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. तर सतेज पाटील यांनी समर्थन दिले आहे.

माजी मंत्री जानकर महादेव जानकर यांनी कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे एका कार्यक्रमा वेळी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे दुग्ध विकास व पशुसंवर्धन विभागाची मंत्री पदाची जबाबदारी दिली होती. तेव्हा काहींना गोकुळ दूध संघ हा बहुराज्य करण्याचा घाट घातला होता. तो करावा यासाठी मंत्रालयात माझ्याकडे काहींनी आग्रह झाला होता. त्यासाठी मला २०० कोटीची ऑफर दिली होती. पण कोल्हापुरातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ही ऑफर धुडकावल्याचे जानकर यांनी नमूद केले.

राळ उठवण्याचे काम

महादेव जानकर यांनी केलेल्या आरोपांनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महादेव जानकर यांच्या वक्तव्याचे आपल्याला आश्चर्य वाटले. इतक्या दिवसानंतर त्यांनी अशा पद्धतीने का वक्तव्य केले हे त्यांनी अगोदर स्पष्ट करायला हवे होते, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यांनी आताच वक्तव्य केले असेल तर त्याची स्पष्टता त्यांनी द्यायला हवी. निवडणुकीच्या तोंडावर राळ उठवून देण्याचे हे काम असेल, असेही मुश्रीफ यांनी ठणकावले आहे.

गोकुळ घशात घालण्याचा डाव

यावर विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी तत्कालीन भाजप सरकारच्या काळातील दुग्धविकास मंत्र्यांकडेच काही लोक गोकुळ बहुराज्य करण्यासाठी देवाण-घेवाणीची चर्चा घेऊन गेले होते, ही बाब आता समोर आली आहे. गोकुळला आधी बहुराज्य करायचे आणि नंतर देशभरात कोणाच्या तरी घशात घालायचे, असा हा मोठा डाव चालू आहे, असा आरोप त्यांनी केला.

गोकुळची चर्चा दिल्लीत

महायुतीचे नेते निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आघाडीसाठी सोमवारी नवी दिल्लीला जाणार आहेत. तेथे पक्षश्रेष्ठींसोबत महत्त्वाची बैठक करून निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याची उपहासमात्मक टीका सतेज पाटील यांनी केली.