कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कपूर वसाहत भागातील भूखंड बळकावण्याचा प्रयत्न सतेज पाटील करीत असल्याचा अपप्रचार काही भंपक माणसांनी केला. असा प्रकार करायला मी काही महाडिक नाही, अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथील विजयी सभेत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. हीच कपूर वसाहत मी झोपडपट्टीधारकांच्या नावावर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्याबद्दल भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचे निवासस्थान असलेल्या कदमवाडीत जाहीर सत्कार करून विजयी सभा घेण्यात आली. निवडणूक काळात झालेल्या आरोपांवर बोलण्याचे टाळलेले पालकमंत्री पाटील या सभेत याच मुद्दय़ावर आक्रमक झाले.
मंत्री पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी कदमवाडी, भोसलेवाडी, कपूर वसाहत परिसरात दडपशाही करूनही या भागातील मतदारांनी त्यांना त्यांच्याच भागात रोखले.
विकासकामांचे नारळ फोडताना कोणी दडपशाही करायला लागला, तर मला बोलवा. बंटी पाटलांचे दांडके असून घट्ट आहे, असा शब्दप्रयोग पाटील यांनी केला. बी टेन्युयर जमिनीचा विषय निकाली काढण्यास पुढील काही दिवसांत विशेष शिबिर घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कदमवाडी परिसरातील सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय महानगरपालिकेला मते मागायला येणार नाही, असे नमूद करून ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, काळम्मावाडी नळपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. टीकाकार कितीही टीका करू देत; पण आम्ही कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ या योजनेच्या पाण्यानेच घालणार आहोत. आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, भीमराव पोवार, राजू लाटकर, भारती पोवार यांची भाषणे झाली.