सांगली : सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये आरक्षित डब्यातील महिलांचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना लोणंद- सालपा स्थानका दरम्यान घडली. अज्ञात दोन ते तीन चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. दागिने खिडकीतून हिसकवताना गाडीच्या एस वन बोगीतील महिलांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले.
या चोरीमध्ये मुंबई येथून कराड स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या सुनिता गोरक्षनाथ तुपे (वय ४४, रा. मोठादेवी मंदिर, पंचशीलनगर, ट्रॉली लाईन, हनुमान गल्ली कंजूरमार्ग ईस्ट मुंबई) यांच्या गळ्यातील ४५ हजार ६०० रुपयांचे मंगळसूत्र आणि सहप्रवासी सुरेखा बाबासाहेब खाडे (वय ४०, रा. रु. न. ३०५ वेलविशर टाऊन, खोपोली ता. खालापूर जि. रायगड) यांची ७ हजार रुपये किमतीची सोन साखळी चोरट्याने लंपास केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस आपल्या नियमित वेळेनुसार पुणे ते कोल्हापूर दरम्यान धावताना लोणंदनंतर सालपाकडे स्थानकादरम्यान धावताना सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड करून मध्यरात्री अडीचच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस सिग्नल अभावी थांबल्यानंतर हा प्रकार घडला. अज्ञात चोरट्यानी रेल्वे मार्गाच्या सिग्नलमध्ये बिघाड केल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस सालपा-स्थानकाच्या मागे थांबली यावेळी या संधीचा फायदा घेत चोरट्याने एस – डबा मधील ९, १०, ११, १२ या सीट नंबर वरून प्रवास करणाऱ्या सुनीता गोरक्षनाथ तुपे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यावेळी याच डब्यामध्ये ६७, ६९ या सीटनंबर प्रवास करणाऱ्या सुरेखा बाबासाहेब खाडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने हिसकावून लंपास केली. यावेळी महिलांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले.
वर्षभरात मिरज पुणे मार्गावर तीन चोऱ्या
नुकतेच तीन महिन्यापूर्वी भिलवडी, ताकारी आणि रविवारी मध्यरात्री सालपा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड करून प्रवाशांच्या साहित्याची मौल्यवान वस्तूची चोरी झाल्यामुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच वर्षभरात तब्बल तीन धाडसी चोऱ्या झाल्यामुळे रेल्वे सुरक्षा बाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वेला सुरक्षा असताना सिग्नल मध्ये बिघाड करून ही चोरी झाल्यामुळे प्रवाशी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.
