अलमट्टीची उंची वाढविण्यास महाराष्ट्राचा पुन्हा विरोध?

यापूर्वी राज्य शासनाने नेमलेल्या महापूरविषयक समित्यांनी अलमट्टी धरणबाबत स्पष्ट भाष्य केलेले नाही

दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर
:  जुलै महिन्यातील महापुराने अलमट्टी धरणाची पाणी पातळी किती असावी यावर मतमतांतरे झडत आहेत. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटपर्यंत वाढवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ातील पुराची स्थिती आणखी गंभीर होणार का, असा प्रश्न आहे. यापूर्वी राज्य शासनाने नेमलेल्या महापूरविषयक समित्यांनी अलमट्टी धरणबाबत स्पष्ट भाष्य केलेले नाही. तज्ज्ञांमध्ये ही यामध्ये मतभेद आहेत. यामुळे राज्य शासन त्याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार हा मुद्दा चर्चेत आला आहे.

गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रा यानंतर कृष्णा नदीचे पात्र सर्वात मोठे आहे. सुमारे १३०० किलोमीटर वाहणारी कृष्णावेणी ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या चार राज्यात वाहते. पश्चिम घाटात तालुक्यात उगम पावलेली कृष्णा बारमाही तुडुंब वाहत असते. महाराष्ट्र राज्यात ती सुमारे २८५ किलोमीटर अंतर वाहते. पुढे ती कर्नाटकात जाते. ज्या प्रदेशात नदी वाहते तिच्या आजुबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम, सिंचनयुक्त व्हावा यासाठी चारही राज्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून आपल्या राज्याला अधिकाधिक कृष्णेचे पाणी मिळावे असा प्रयत्न सुरू असून त्यावरून वाद रंगत आहेत. यासाठी कृष्णा पाणी तंटा लवाद नियुक्त केला आहे. या लवादाचे १९७३-७६, २०१० आणि २०१३ असे तीन अहवाल सादर झाले आहेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयात वादही सुरू आहेत.

कर्नाटकचा प्रश्न

कृष्णा नदीतील पाणी अडवून दुष्काळी भागात सिंचन व्यवस्था पोहोचवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या ३० वर्षांत तेथे या बाबतीत मोठी प्रगती साधली आहे. विजापूर व बागलकोट जिल्ह्य़ात अलमट्टी धरण साकारले आहे. प्रारंभी धरणाची उंची ५०७ मीटर होती. पुढे न्यायालय, कृष्णाला लवाद यांचा आधार घेत कर्नाटकने धरणाची पाणी पातळी ५१९ मीटर ठेवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. यातून धरणाची पाणी साठवण क्षमता सध्याच्या १२३ टीएमसी असून उंची आणखी ५ मीटर वाढल्यास आणखी ७७  टीएमसी भर घालणार आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पंतप्रधानांच्या भेटीत हा मुद्दा मांडला होता. हाच मुद्दा नवे मुख्यमंत्री बोम्मई यांनी रेटला आहे. ते मूळचे अभियंता असून जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते शेगाव हावेरी या उत्तर कर्नाटकातील मतदारसंघातून निवडून येतात. या भागात अधिक सिंचनाची गरज असल्याची भूमिका त्यांनी सुरुवातीपासून घेतली आहे.

महाराष्ट्राला पुराचा धोका?

२००५ च्या महापुरानंतर पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी विधिमंडळात अलमट्टीचा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने ५१९ मीटपर्यंत पाणी अडविण्यास कर्नाटक राज्याला परवानगी दिले असल्याचे नमूद केले होते. महापुरानंतर राज्य शासनाने दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. शिवाय ५१९ ते ५२४ मीटपर्यंतच्या परवानगी संबंधात लवादाने निर्णय घ्यावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. राज्यशासन संपूर्ण ताकदीने धरणाची उंची ५०९ मीटपर्यंत राहावी असा प्रयत्न राहील, असे उत्तर देण्यात आले होते. तोवर कर्नाटकने अलमट्टीची उंची ५१९ मीटर पर्यंत तर वाढवलीच, पण आता ५२४ मीटरचा ध्यास घेतला आहे. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा एकदा महापुराचा धोका आणखी उद्भवू शकतो.

मात्र तो कितपत उद्भवणार याबद्दल साशंकता आहे. अलमट्टी धरणाच्या अलीकडे सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या हिप्परर्गी बंधाऱ्याची उंची अधिक असल्याने  तेथेच अलमट्टीचा फुगवटा थांबत असल्यामुळे महाराष्ट्राला अलमट्टीचा पुराचा धोका संभवत नाही, असे कर्नाटकातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञांनी अलमट्टी धरण झाल्यापासूनच पश्चिम महाराष्ट्राला तीन वेळा पुराचा जबरदस्त तडाखा बसण्याचे स्पष्ट केले आहे. कोल्हापुरात अलीकडेच पूर विषय अभ्यासकांच्या चर्चेमध्ये जल तज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी ‘महापुराची कारणमीमांसा तपासण्यासाठी कृष्णा खोरे व अलमट्टी धरण यांचा समग्र अभ्यास होणे गरजेचे आहे.  वडनेरे समितीनेही अलमट्टी धरण महापूराला कितपत कारणीभूत आहे याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले नव्हते. त्यावर स्वतंत्र अभ्यास व्हावा असे मत त्यांनी नोंदवले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अलमट्टीची उंची वाढवण्यास विरोध केला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा अभ्यास करण्याची सुचना जलसंपदा विभागाला केली आहे. निष्कर्ष निघाल्यानंतर कर्नाटक सरकारशी चर्चा करू. पूरकाळात चालू वर्षी कर्नाटकाने चांगले सहकार्य केले असल्याने त्यांच्याशी चर्चा करू. टोकाची भूमिका योग्य असल्याचे वाटत नाही.’ अशी भूमिका घेतली आहे.

चार राज्यांमधील वाद

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा वाद महाराष्ट्र-कर्नाटक पुरता सीमित राहत नाही, तर तो पुढे दक्षिणेतील तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यापर्यंत जातो. कृष्णेचे पाणी अधिक मिळावे यासाठी कर्नाटक -आंध्र प्रदेश या राज्यात वाद सुरू आहे. त्याला अलमट्टी उंचीच्या वादाने फोडणी दिली आहे. याच वेळी आंध्र प्रदेश- तेलंगणा या राज्यातही जुंपलेली आहे. एकूणच कृष्णेच्या पाण्याचे विभाजन कसे होणार यावर लवाद, न्यायालयाकडून भूमिका स्पष्ट झाल्यावरच प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra again opposes raising the height of almatti dam zws