कोल्हापूर : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालांमध्ये कोल्हापूर विभागाचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.९७ टक्के राहिले आहे. मागील वर्षी कोल्हापूर विभागाचा द्वितीय क्रमांक होता. तथापि, यंदा हे मंडळ निकालात राज्यात सहाव्या क्रमांकावर राहिले असून मागील वर्षीच्या तुलनेत ३.६७ टक्केची निकालात घट झाली आहे.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात, उत्तीर्णतेच्या प्रमाणात कोल्हापूर जिल्हा ९१.८६ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर राहिला. दुसऱ्या क्रमांकावर ९०.८९ टक्क्यांसह सातारा जिल्हा, तर ८६.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सांगली जिल्हा तिसऱ्या (अंतिम) क्रमांकावर राहिला. कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली.

परीक्षेसाठी एकूण १,११,४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,१०,४६८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि ८९.९७ टक्केवारीसह ९९,३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या एकूण ५७,५०९ मुलांपैकी ४९,१८५ मुले उत्तीर्ण झाली (उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५२ टक्के). तर ५२,९५९ मुलींपैकी ५०,२१३ मुली उत्तीर्ण झाल्या (उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.८१ टक्के). मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण एकूण ९.२९ टक्क्यांनी अधिक राहिले आहे. गतवर्षीच्या ९३.६४ टक्केवारीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालाची एकूण टक्केवारी ३.६७ टक्क्यांनी कमी झाली आहे.

सांगली पिछाडीवर

जिल्हानिहाय विचार करता सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल राज्याच्या टक्केवारी इतका दिसून येतो. मात्र सांगलीचा निकाल राज्याच्या निकालापेक्षा कमी आहे.  मागील वर्षी कोल्हापूर विभागाचा द्वितीय क्रमांक होता.  यंदा हे मंडळ निकालात राज्यात सहाव्या क्रमांकावर राहिले असून मागील वर्षीच्या तुलनेत ३.६७ टक्केची निकालात घट झाली आहे.

निकाल घटण्याची कारणे

यावर्षीच्या परीक्षेत प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्हीचा केलेला वापर, सांगली जिल्ह्यात प्रत्येक वर्ग खोलीत पर्यवेक्षकांच्या मोबाईलवरून झूम ॲपच्या मदतीने जिल्हा दक्षता समितीने केलेले परीक्षेचे नियंत्रण यामुळे निकालातील पारदर्शकता वाढली आहे. यामुळे निकालात घट झाली आहे.

गुणवत्तेत वाढ कशी?

  मागील वर्षापासून कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात निकालातील गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. निकालातील फुगवटा कमी होऊन निकालातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने बोर्ड परीक्षेचा राजमार्ग ही अभिनव पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये शाळांनी वर्षभर करायचे प्रशासकीय व शैक्षणिक नियोजन तसेच परीक्षापूरक उपक्रम यांचा समावेश केलेला आहे, असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.