कोल्हापूर : अनेकांना रेल्वेचा प्रवास दुरापास्त. तिथे विमानाने प्रवास करण्याचा मुद्दाच उद्भवत नाही. अशी स्थिती असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील खेडोपाड्यातील तेही अपेक्षित घटकातील विद्यार्थी चक्क विमानाने शुक्रवारी इस्त्रोसारख्या संस्थेकडे रवाना झाले. हा अनोखा प्रसंग पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून शुक्रवारी घडला. विमानातून उड्डाण घेताना या विद्यार्थ्यांचे खुललेले चेहरे बरेच काही सांगून जाणारे होते.
इस्रोसारख्या संस्थेला भेट दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत होईल. त्यांच्यात आत्मविश्वास येऊन उज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळेल, असे मग पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी असा उपक्रम राबविण्यात येत असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राज्यातील पहिल्याच उपक्रमात ३५२ विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.
दौर्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाजकल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या ४ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या मसुदमाले ( पन्हाळा ), गगनबावडा, शिरोळ व राधानगरी येथील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थीनींचा समावेश आहे.
अभ्यास दौर्यातील विद्यार्थ्यांना इस्रोमधील अंतराळ संशोधन, उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण प्रक्रिया तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून, त्यामुळे विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेतील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाकडील निवासी शाळेतील ७२ विद्यार्थ्यांचा ‘इस्रो अभ्यास दौरा रवाना कार्यक्रम’ आज उत्साहात पार पडला. या उपक्रमासाठी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. यावेळी ते बोलत होते
ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख होणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च केला तर काय होऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील समाज कल्याण विभागाच्या विविध योजना. या उपक्रमामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील इस्रोला जाण्याबद्दल ओढ निर्माण होईल, असे मत प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग. वंदना कोचुरे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, सुप्रिया काळे, श्रीमती. चित्रा शेंडगे, श्री. सचिन परब, श्री. अतुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
