कोल्हापूर : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रांचे खात्यांचे सोमवारी फेर वाटप केले. यामध्ये कोल्हापुरातील सतेज पाटील यांना लॉटरी लागली असून राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बिनखात्याचे मंत्री बनले आहेत.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडील पाच खाती काढून घेण्यात आली. दुसरे मंत्री सतेज पाटील यांच्याकडे आणखी चार खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. पाटील यांच्याकडे आता पालकमंत्रीसहा १० खात्यांच्या पदभार आहे. तर, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्यात बदल झाला नाही. जनहिताची कामे अडकून नयेत म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री, राज्यमंत्री यांच्या खात्याचे फेरवाटप केले आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडील पाच खाती अन्य मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन, शंभूराज देसाई यांच्याकडील कौशल्य विकास, अब्दुल सत्तार यांच्याकडील ग्राम विकास व बच्चू कडू यांच्याकडील जलसंपदा ही चार नवी खाती सतेज पाटील यांच्याकडे आली आहेत. सध्या त्यांच्याकडे गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण या विभागांचे राज्य मंत्रीपद आहे.