कोल्हापूर: बारावी पाठोपाठ मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालांमध्ये कोल्हापूर विभागाची घसरण झाली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण ९५.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा उत्तीर्णतेचे प्रमाण गेल्या वर्षीच्या ९६.८७ टक्के उत्तीर्णतेच्या प्रमाणापेक्षा १.४० टक्क्यांनी घटले आहे. तर, बारावीच्या परीक्षेत मागील वर्षीच्या तुलनेत ३.६७ टक्केची निकालात घट झाली होती.

दरम्यान, संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली. शालेय जीवनात दहावीच्या परीक्षेला अनन्य साधारण महत्व असते. दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे काल सांगण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची हुरहूर वाढली होती. आज लागलेल्या निकालात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात, कोल्हापूर जिल्हा ९६.६७ टक्के उत्तीर्णतेसह प्रथम क्रमांकावर राहिला.

सांगली पिछाडीवरच

दुसऱ्या क्रमांकावर ९५.७१ टक्के उत्तीर्णतेसह सातारा जिल्हा, तर ९३.५६ टक्के उत्तीर्णतेसह सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. जिल्हानिहाय विचार करता बारावी पाठोपाठ सांगली जिल्हा दहावीच्या निकालातही पिछाडीवर राहिला.

कोल्हापूर विभागीय सचिव राजेश क्षीरसागर, विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत या निकालांची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १,२९,४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि १,२९,००६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते; त्यापैकी १,२३,१७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४७ टक्के इतके आहे.

मुलींची बाजी

एकूण विद्यार्थ्यांपैकी ६९,६०१ विद्यार्थी हे मुले होते आणि त्यातील ६५,३३० विद्यार्थी (९३.८६ टक्के) उत्तीर्ण झाले. तर ५९,४०५ विद्यार्थीनी होत्या आणि त्यातील ५७,८४१ विद्यार्थीनी (९७.३६ टक्के) उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण एकूण ३.५० टक्क्यांनी अधिक राहिले आहे.

बारावीचा निकाल कसा?

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालांमध्ये कोल्हापूर विभागाचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.९७ टक्के राहिले. मागील वर्षी कोल्हापूर विभागाचा द्वितीय क्रमांक होता. तथापि, यंदा हे मंडळ निकालात राज्यात सहाव्या क्रमांकावर राहिले असून मागील वर्षीच्या तुलनेत ३.६७ टक्केची निकालात घट झाली. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात, उत्तीर्णतेच्या प्रमाणात कोल्हापूर जिल्हा ९१.८६ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर राहिला. दुसऱ्या क्रमांकावर ९०.८९ टक्क्यांसह सातारा जिल्हा, तर ८६.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सांगली जिल्हा तिसऱ्या (अंतिम) क्रमांकावर राहिला.