कोल्हापूर : पश्चिम आशियात गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध तात्पुरते थांबले असले तरी यामुळे वस्त्रोद्योगाची आर्थिक घडी पूर्ण विस्कटली आहे. कापूस, सुतासह अन्य कच्च्या मालामध्ये २५ ते ४० टक्क्यांहून जास्त दरवाढ झाली आहे.
वाढता उत्पादन खर्च, थंडावलेली मागणी आणि ठप्प झालेली निर्यात यामुळे उद्योग पूर्णपणे अडचणीत आला आहे. यातून गेल्या महिन्याभरात राज्यातील वस्त्रोद्योगाचे तीन हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे वस्त्रोद्योग महासंघाच्या आढाव्यातून पुढे आले आहे. हा वाढता तोटा नियंत्रित करण्यासाठी अनेक उद्योगांनी एका पाळीतील काम बंद किंवा आठवड्यातील दोन दिवस काम बंदचे पर्याय निवडले आहेत. तसेच युद्ध थांबल्यानंतरही पूर्ववत स्थिती येण्यास मोठा काळ लागणार असल्याने हे नुकसान आणखी वाढणार आहे.
कच्च्या तेलापासून तयार होणार्या मानवनिर्मित धाग्याच्या किमतीमध्ये २५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी गेले अनेक महिन्यांपासून कापसाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ – घट होत नव्हती. कापसापासून तयार होणारे सुताचे दरही बर्यापैकी स्थिर होते. परिणामी कापड उत्पादन खर्चात लक्षणीय बदल जाणवत नव्हता.
२९ मिमी प्रकारच्या कापसाचे दर महिन्याभरात प्रतिखंडी ५४ हजार रुपयांवरून ६१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
तर, ५ किलो सुताचा १२६० रुपये इतका असणारा दर आता १४१५ रुपयांपर्यंत वाढला आहे. शिवाय, कापसाची मागणीही घटली आहे. कच्च्या मालामध्ये दरवाढीचा आलेख उंचावत असताना पक्क्या मालाच्या दरामध्ये फारशी वाढ झालेली नाही. पॉपलिनसारख्या कापड प्रकारात प्रति मीटर एक रुपये इतकी अत्यल्प वाढ झाली आहे. कापडाला मागणी नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.
क्षेत्रनिहाय नुकसान
- विणकाम (विव्हिंग) – १ हजार कोटी,
- सूतगिरणी – ८०० कोटी,
- कापड प्रक्रिया (प्रोसेसिंग) -४०० कोटी रुपये,
- तयार कपडे (गारमेंट ) – ११०० कोटी.
या संकटामुळे सूतगिरण्यांना सरासरी दोन ते तीन दिवस उत्पादन बंद ठेवावे लागत आहे. नव्याने कापड मागणीचे प्रमाण अत्यल्प असून निर्यात मंदावली आहे. या सर्वांचा देशातील विविध संघटनांनी घेतलेल्या आढाव्यानंतर वस्त्रोद्योगाचे सुमारे चार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती वस्त्रोद्योजक आणि वस्त्रोद्योग संघटनेचे पदाधिकारी किरण तारळेकर यांनी व्यक्त केली.
गेल्या दोन-चार दिवसांत सूत, कापडाची मागणी ठप्प झाली आहे. केवळ आगावू नोंदणीचा केलेला माल उचलला जात आहे. उत्पादन, उलाढाल, निर्यात थांबली आहे. याचा वस्त्रोद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. – अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ.
वस्त्रसाखळीत वापरल्या जाणार्या कोळसा, क्रूड इंधन या ऊर्जा मालाच्या किमती वाढल्याने विणकाम, सूतगिरण्या, तयार कपडे, कापड प्रक्रिया उद्योग अशी संपूर्ण वस्त्रसाखळी प्रभावीत झाली आहे. अनेक केंद्रात नाईलाजास्तव उत्पादन नियंत्रित करावे लागले आहे. – किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ, अध्यक्ष, विराज स्पिनर्स.
