कोल्हापूर : वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ५१३ ठिकाणी अनधिकृत वीज वापर व वीजचोरी उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. या विशेष मोहिमेदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात ४,७४१ तर सांगली जिल्ह्यात २,९९० वीज ग्राहकांच्या मीटर व जोडण्यांची कसून तपासणी करण्यात आली.
कोल्हापूर शहर विभागात २३, कोल्हापूर ग्रामीण विभाग-१ मध्ये १७, कोल्हापूर ग्रामीण विभाग-२ मध्ये ९५, जयसिंगपूर विभागात २३, इचलकरंजी विभागात १४ आणि गडहिंग्लज विभागात ३६ अशा वीजचोरांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. सांगली शहर विभागात ४, सांगली ग्रामीण विभागात ४१, कवठेमहांकाळ विभागात ९६, विटा विभागात १०३ आणि ईश्वरपूर विभागात ६१ जणांवर कलम १२६ व १३५ अन्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी कोल्हापूर मंडलात ८३ आणि सांगली मंडलात २८० वीजचोरे सापडले.वीजचोरीविरोधात नियमित सुरू असलेली ही मोहीम यापुढे आणखी तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिले आहेत. दरम्यान, नागरिकांनी विजेची चोरी करण्याचे धाडस न करता अधिकृत वीजजोडणी घ्यावी आणि संभाव्य फौजदारी कारवाईसह कारावासाची शिक्षा टाळावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
