सातारा: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील तीन पक्षांनी एकूण ६५ जागांपैकी तब्बल ६३ जागांवर विजय मिळवला असला तरी सत्ता स्थापन करण्यासाठी आता या तीन पक्षांमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ जागांपैकी भाजपाला सर्वाधिक २७ जागांवर यश मिळाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला २१ आणि शिवसेना शिंदे पक्षाला १५, काँग्रेस एक आणि अपक्ष दोन असे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे आता कोणते दोन पक्ष एकत्र येतात की जिल्हा परिषदेवर एकत्रित महायुतीची सत्ता येते, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे महायुतीतील पक्षांच्या सत्ता मिळवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सातारा हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेसचे सत्ता होती. त्यानंतर कॉग्रेसमधून बाहेर पडत स्थापन झालेल्या राष्ट्रवादीची सत्ता आली. यंदा महायुतीतील तीन पक्षांना सत्ता मिळाली असली तरी कुठल्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालेले नाही. यामुळे कुठल्यातरी दोन, तीन पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. महायुतीतील हे तीनही पक्ष स्वतंत्ररित्या लढले होते. आता सत्तेसाठी त्यातील कुठल्यातरी दोघांना किंवा तिघांना एकत्र यावे लागणार आहे. निकालाने तयार केलेल्या या संख्याबळामुळे आता जिल्ह्यातील राजकीय हालचालींना गती आली आहे. या प्रक्रियेमध्ये कुठल्याही दोन पक्षांनी एकत्र येताना त्या पक्षांच्या वरिष्ठांनाही त्यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. शिवाय कुठले दोन पक्ष एकत्र येतात यावर राज्यातील अन्य ठिकाणची राजकीय गणितेही अवलंबून असल्याने हा निर्णय दिसतो तेवढा सोपा नाही. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने वरिष्ठांच्या निर्णयाला प्राधान्य दिले जाईल, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शरणागत विरोधी पक्ष

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात खरे विरोधी पक्ष दिसेनासे झाले आहेत. यानंतर झालेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रमुख लढत ही महायुतीतील पक्षांमध्येच झाल्याचे दिसून आली. याचेच प्रत्यंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही घडले. वास्तविक जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक ही ग्रामीण भागाशी निगडीत असल्याने त्यामध्ये महायुतीला महाविकास आघाडीतील पक्षांशी मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दोन्ही काँग्रेसची कार्यकर्त्यांची ताकद, सहकाराचे जाळे या जीवावर ही निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांतील निराश मनोवृत्तीतील आघाडीतील घटक पक्षांकडून या निवडणुकीतही संघर्ष घडलाच नाही. महायुतीतील तीन घटक पक्षांमध्येच ही राजकीय लढाई झाल्याचे पाहण्यास मिळाले.

पवार गटाचे पानिपत

सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर यातील मुख्य ताकद ही अजित पवार गटाच्या मागे उभी राहिली. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली. मात्र, यामध्ये केवळ अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तुतारी चिन्हावर लढलेल्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या पक्षाचे संख्याबळ हे शून्य राहिले आहे. कधीकाळी जिल्ह्यात मुख्य पक्ष असलेला काँग्रेस पक्ष तर जिल्ह्यात सर्व जागाही लढवू शकला नाही. ज्या लढवल्या त्यातूनही या राष्ट्रीय पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना ठाकरे गट तर निवडणूकच लढला नाही. खऱ्या विरोधी पक्षांची ही कामगिरी पाहता निवडणूकीपासून ते निकालानंतर आता सत्तेचा सगळा खेळ हा महायुतीअंतर्गतच सुरू रंगला. खऱ्या विरोधी पक्षांची स्थिती शरणागत झाली आहे.