सांगली :  जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन करणे कठीण असले तरी महायुतीचाच अध्यक्ष होईल असा विश्‍वास  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. याबाबत महायुतीतील अन्य घटक पक्षांशी बोलणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याची कबुली देत पालकमंत्री म्हणाले, सात जागी कमी मतांच्या  फरकाने आमच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. भाजप आणि मित्र पक्षाला १८ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी ३१ सदस्यांची गरज आहे. ही गरज महायुतीतील घटक पक्षांच्या माध्यमातून पूर्ण होउ शकते. महापालिकेत सत्ता  स्थापन करत असताना फारसी अडचण आली नाही. कारण अजितदादांशी अपघाताच्या आदल्या रात्रीच चर्चा झाली होती. या चर्चेत राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले. तसे त्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांनाही निरोप दिले होते. यामुळे महापालिकेत सत्ता स्थापन करत असताना अडचण आली नाही.

जिल्हा परिषदेत मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी जादा सदस्यांची गरज भासत असून सत्ता  स्थापन करणे कठीण वाटत असले तरी अध्यक्ष हा महायुतीचाच होईल यात शंका नाही. याबाबत मित्र पक्षांशी बोलणी सुरू असून आज दोन बैठका झाल्या आहेत. उद्याही यावर चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

सांगली जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये पहिल्या टप्प्यात जरी शिवसेनेला पद दिलं नसेल तरी महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल शिवसेना ही आमच्या सोबत आहे, स्थायी समितीत १६ सदस्य असतात. दरवर्षी १६ असे पाच वर्षात ८० सदस्यांना यामध्ये संधी देता येते. ज्यांना पद देता आले नाही, त्यांना निधीमध्ये झुकते माप देण्यात येईल. शिवसेना शिंदे पक्षालाही टप्प्याटप्प्याने सत्तेत वाटा दिला जाईल असेही ते म्हणाले.

आमदार जयंत पाटील आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली हे खर आहे मात्र प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलींनीकरण हा त्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांचा तो प्राधान्याचा विषय असला तरी आमचा नाही. मात्र, जर विलीनीकरण झाले तर काय याबाबत आमची भूमिका लक्षात घ्यावी लागेल. यावर आमचा अजेंडा असेल असेही मंत्री पाटील म्हणाले.    
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याअपघाती निधनावर  रोहित पवार यांनी केलेल्या आरोपवर आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येक गोष्टीवर शंका व्यक्त करण्याचा अधिकार आहे। तसे रोहित पवारांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका व्यक्त केली आहे, या अपघाताबाबत जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावे. जर यामध्ये काही काळबेरे असेल तर त्याची चौकशी होईल असेल असेही ते म्हणाले.