सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित १६सदस्य व गटनेतेपदाची नोंदणी सोमवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते व सदस्यांची नोंदणी लांबणीवर पडली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रवादीने सोमवारची वेळ घेतली होती. त्यानुसार नूतन सदस्यांची शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी बैठक घेतली. यातून सर्वांनुमते व जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा. जगदाळे यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या नावाची शिफारस प्रदेश राष्ट्रवादीकडे केली होती.
सोमवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री मकरंद पाटील व शहर जिल्हाध्यक्ष प्रा. जगदाळे यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांच्या निवडीची घोषणा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नूतन सोळा नगरसेवक उपस्थित होते.

