कोल्हापूर : थंडीचा कडाका संपून उन्हाळा सुरू झाला की कपाटातील सुती कपडे बाहेर यायला सुरुवात होते. सुती कपड्यांमुळे असणाऱ्या काही गुणधर्मांमुळे उन्हाळा काही प्रमाणात सुसह्य होतो. पण नुकत्याच झालेल्या एका देशव्यापी सर्वेक्षणातून देशात सुती कपड्यांपेक्षा मानवनिर्मित धाग्यांपासून बनवलेले कापड वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने अलीकडे जाहीर केलेल्या राष्ट्रीय घरगुती सर्वेक्षणातून ही बाब अधोरेखित झाली आहे. यामध्ये देशात मानवनिर्मित तंतू आणि मिश्र तंतूवर आधारित कपड्याचे उत्पादन आणि वापर ५२.२ टक्के इतका झाला आहे. तर आजवर मिराशी असलेल्या कापसाच्या नैसर्गिक धाग्यांंपासून बनवलेल्या कपड्याचे उत्पादन आणि वापर ४८ टक्क्यांपर्यंत घटले आहे.

देशातील वस्त्रोद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे. कोणतेही वस्त्र बनवण्यासाठी धागा ही प्राथमिक गरज असते. धागा हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन प्रकारांच्या घटकापासून बनवला जातो. भारतात कापूस हा नैसर्गिक धाग्यातील सर्वात महत्त्वाचा घटक होय. शिवाय लोकर, रेशीम अशा नैसर्गिक घटकापासूनही धागे बनवले जातात. यामध्ये कापूस हा भारतीय वस्त्रोद्योगाचा प्रमुख आधार राहिला आहे. भारतात कापूस लागवडीखालील क्षेत्र ११४ लाख हेक्टर असून ते जगाच्या ३१४ लाख हेक्टर क्षेत्राच्या प्रमाणात ३६ टक्के इतके आहे.

भारतात नैसर्गिक धाग्याचे विशेषतः कापसापासून बनवलेल्या धाग्याचे प्रमाण सुमारे ४० वर्षापर्यंत ७० टक्के इतके होते. तर मानवनिर्मित धाग्याचे प्रमाण ३० टक्के होते. गेल्या चार दशकाच्या कालावधीत मानवनिर्मित धाग्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. भारतीय कृत्रिम धाग्याच्या बाजारपेठेने सन २०२४ मध्ये ४.५२ दशलक्ष टनाचा आकार गाठला आहे. कृत्रिम धाग्यामध्ये प्रामुख्याने पॉलिस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक, स्पंडिक्स आदींचा समावेश आहे. नैसर्गिक धाग्याच्या तुलनेने त्यांच्या बहुउपयोगीतेमुळे, उत्कृष्ट कामगिरीमुळे वस्त्रोद्योग, गृह, औद्योगिक उत्पादनात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. इतका की आता मानवनिर्मित धाग्यांच्या तंतूपासून उत्पादित मालाचे भारतीय बाजारपेठेतील प्रमाण ५२ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. त्या खालोखाल पूर्वी आघाडीवर असलेला शुभ्र कापसाचे स्थान राहिले आहे.

या अहवालात कापसापासून तयार कपड्याचे प्रमाण ४१.२ टक्के नोंदवले गेले आहे. रेशीम आणि लोकरी तंतूचे प्रमाण अनुक्रमे ५.२ टक्के आणि १.३ टक्के इतके राहिले आहे. मानवनिर्मित कापडाच्या मागणीत सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे. अहवालात नोंदवल्याप्रमाणे २०२४ वर्षापर्यंत मानवनिर्मित धाग्यापासून बनवलेल्या कापडाची बाजारपेठ ४.४७ लाख कोटींपर्यंत वाढली आहे. तर कापसापासून बनवलेल्या धाग्याची कापडाची बाजारपेठ ३.५३ लाख कोटी इतकी आहे.

मानवनिर्मित धाग्यापासूनचे कापड टिकाऊ, स्वच्छेतेसाठी पूरक आणि स्वस्त ही या कापड वापर वाढण्यामागील काही कारणे असल्याचे उद्योजक आणि अभ्यासकांनी सांगितले.

मानवनिर्मित धाग्यापासून बनवलेले कपडे दीर्घकाळ टिकतात. त्याची स्वच्छता अधिक राहते. सामान्य लोकांना हे कापड परवडणारे आहे. यामुळे गेल्या २५ वर्षांमध्ये मानवनिर्मित धाग्यापासून बनलेली कापडाची बाजारपेठ भारतातही वाढत चालली आहे. जागतिक पातळीवर आधीच मानवनिर्मित धाग्याचे प्रमाण ७२ टक्के तर नैसर्गिक धाग्याचे प्रमाण २८ टक्के आहे. आता भारतातही हा महत्त्वपूर्ण बदल दिसू लागला आहे. – प्रा. डॉ. सी. ए. पाटील, वस्त्रोद्योग अभ्यासक, डीकेटीई सोसायटी टेक्सटाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी

पॉलिस्टर आणि सिंथेटिक कापड सामान्य लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. कारण ते किफायतशीर, टिकाऊ आहे. त्याची देखभाल करणे सोपे (सुरकुत्याविरहित) असते. सुती आणि पॉलिस्टरपासून बनवलेल्या मिश्रित कापडांनाही भारतीय वस्त्र बाजारात मान्यता मिळत आहे. कापूस, लोकर, रेशीम आदी धागे हंगामी असतात. तुलनेने मानवनिर्मित धाग्याची निर्मिती कोणत्याही हंगामात (बारमाही) करता येते. यामुळे उद्योगाची प्रचंड मागणी पूर्ण करणे शक्य होते. – शामसुंदर मर्दा, वस्त्र उद्योजक, अरविंद कॉटन इंडिया लिमिटेड