कोल्हापूर : जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. त्याने अल्पसंख्याक दर्जा सोडण्याचा विचार करावा, हे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधान अज्ञानमूलक आहे. किंवा ते ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग आहे, अशी टीका अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवारी येथे केली.
मंत्री लोढा यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या पत्रकात गांधी यांनी म्हटले आहे की, जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वतःचे तीर्थंकर, स्वतःची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालनकर्ते आहोत, परंतु शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत!
अल्पसंख्याक दर्जा हा कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे. तो आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वालाच नाकारणे होय. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करू. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा कोणताही प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जैन समाज आता शांत बसणार नाही हे लोढा यांनी समजून घ्यावे, असा इशारा गांधी यांनी दिला आहे.
…तर जैन समाजावर आघात
हिंदू आणि सनातन संस्कृतीसोबत जैन धर्माचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत आणि राहतील. याचा अर्थ असा नाही की जैन धर्म हा कोणत्याही इतर परंपरेची शाखा आहे. सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालयांमध्ये आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये जैन धर्माची स्वतंत्रता, प्राचीनता सिद्ध झालेली आहे. त्यामुळे या विषयावर नव्याने वाद निर्माण करणे हे जैन समाजावर आघात ठरेल.
राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळण्यापूर्वीच विविध राज्यांमध्ये सुमारे २५ वर्षांपूर्वी जैन समाजाला हा दर्जा मिळालेला होता. या दीर्घ काळात जैन धर्मपरंपरा आणि हिंदू संस्कृती यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमची सांस्कृतिक परंपरा जशी पूर्वी होती, तशीच आजही जपली जात आहे.
अल्पसंख्याक दर्जा हा आमच्या संख्येचे प्रतिबिंब आहे. तो आमच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण, तीर्थक्षेत्रांचे रक्षण, शिक्षण घेण्याचे व संस्था चालवण्याचे हक्क यांचे संरक्षण करतो. तसेच आमच्या प्राचीन वारशाचे जतन करण्यासाठी हा एक प्रभावी माध्यम आहे, असे गांधी म्हणाले.
संघर्षानंतर घटनात्मक अधिकार
जैन समाजातील अग्रणी एल. एम. सिंघवी, वीरेंद्र हेगडे, माजी खासदार विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन (आदित्य), सुरेश जैन, शांतीलाल मुथा, बाळ पाटील, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी, डी. ए. पाटील आदी मान्यवरांच्या दीर्घ प्रयत्नांनंतर आणि संघर्षानंतर हा घटनात्मक अधिकार मिळवण्यात आला आहे.
आर्थिक फायद्यांपेक्षा समाजाच्या अधिकारांचे आणि अस्तित्वाचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा कोणताही प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. लोढा यांनी हे समजून घ्यावे की जैन समाज आता शांत बसणार नाही. त्यांचे विधान आमची एकता अधिक बळकट करेल. ललित गांधी यांनी सर्व जैन पंथांना एकत्र येऊन अशा प्रयत्नांना ठामपणे विरोध करण्याचे आवाहन केले आहे.
