सोलापूर : आगामी गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाच पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यापूर्वी चालू हंगामातील उसाची पहिली उचल अधिकृतपणे जाहीर करावी; जोपर्यंत पहिली उचल जाहीर होत नाही, तोपर्यंत एकाही शेतकऱ्याने शेतातील उसाला कोयता लावू नये, असा आक्रमक भूमिका मंगळवेढा येथील ऊस दर संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आली.
शेतकऱ्यांनी या भूमिकेवर ठाम राहून संपूर्ण एकजूट दाखवावी, असा ठरावही यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. मागील गाळप हंगामात शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर मंगळवेढा तालुक्यातील दामाजी, युटोपियन, भैरवनाथ आणि फॅबटेक या साखर कारखान्यांनी प्रति टन ३,००० रुपये दर देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कारखान्यांनी या लेखी आश्वासनाला हरताळ फासला असून शेतकऱ्यांची संपूर्ण देणी अद्याप दिलेली नाहीत. या बैठकीत कारखान्यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दांत समाचार घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचा फज्जा उडवणाऱ्या आणि थकीत बिले न देणाऱ्या संबंधित कारखान्यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सध्या समोर आलेला पोळा सण आणि आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहावा, यासाठी साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति टन २०० रुपये प्रमाणे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखान्यांना ऊस न देण्याच्या भूमिकेमुळे कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत.
दुसरीकडे तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी संकटावरही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. जळणारी पिके आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ मंगळवेढ्यात सोडण्यात यावे, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या बैठकीस दीपक भोसले, सचिन पाटील, निवास नागणे, राहुल घुले, श्रीमंत केदार, संगमेश केदार, बाळासाहेब बोबडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
