पंढरपूर : पावसाने पाठ फिरवली, सर्व जलाशय कोरडे, हातपंपाला पाणी नाही, पिके करपली, चारा नाही, पाणी नाही, दूध उत्पादन घटले अशा व्यथा मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकापुढे मांडल्या. मका, भुईमुग, डाळिंब, वांगी आदी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. दरम्यान, केंद्रीय पथकाचा अहवाल सात दिवसांत राज्य सरकारकडे येईल, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सूरज पांढरे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला तालुक्याला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. या दोन्ही तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली. परिणामी विहीर, तलाव, हातपंप अशा पाण्याचे स्रोत आटले आहेत. केंद्रीय पथकाचे कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोनुसामी, पेयजल व स्वच्छता विभागाचे प्रमुख अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक सुमित शर्मा यांच्या सह राज्याचे कृषी आयुक्त, आमदार समाधान आवताडे व अन्य अधिकाऱ्यांनी मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील दुष्काळी गावांना भेट दिली.
आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा मतदारसंघात पाऊस न झाल्यामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान आणि निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती पथकाला दिली. आंधळगाव येथे पथकाने बंद पडलेल्या हातपंपाची, तसेच मका आणि भुईमूग पिकांची पाहणी केली. येथील विहिरींच्या भूजल पातळीची पाहणी करताना विहिरींनी तळ गाठल्याचे पथकाला स्थानिकांनी दाखवले.
आंधळगाव शिवारातील दादा जतकर यांच्या शेतातील पावसाअभावी करपलेल्या डाळिंब पिकाची पथकाने पाहणी केली. गोणेवाडी येथील फार्मच्या पशुपालकाकडे २८ गाई असून, दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि पाणी मिळविणे कठीण झाल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. पूर्वी दररोज सुमारे १५० लिटर दूध उत्पादन होत होते; मात्र आता ते घटून ८० लिटरवर आले आहे. चाऱ्याची उपलब्धता कमी झाली असून, चाऱ्याचे दर प्रतिटन सुमारे ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती त्यांनी दिली.
जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळवण्यात अडचणी येत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील दोन महिन्यांत पाणीटंचाईमुळे गावातील नागरिकांना स्थलांतर करावे लागू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या वेळी पथकाने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली. या विहिरीने तळ गाठल्याचे चित्र दिसून आले. विहिरीतील भूजल पातळी अत्यंत खालावल्याने गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्रीय पथकाने सांगोला तालुक्यातील वाकि घेरडी येथील साठवण तलावाची पाहणी केली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा तलाव गेल्या पाच वर्षांत प्रथमच पूर्णपणे कोरडा पडल्याची माहिती दिली. पावसाअभावी जलसाठे आटल्याने परिसरातील पाणी उपलब्धतेवर गंभीर परिणाम झाल्याचे या वेळी स्पष्ट झाले. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी आणि ती वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी केली.
केंद्रीय पथकाचा अहवाल पुढील सात दिवसांत : आयुक्त पांढरे
राज्यातील अनेक विभागांची केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय पथकाकडून एनडीआरएफच्या नियमानुसार एक महिन्यात अहवाल सादर होणे अपेक्षित आहे. मात्र गंभीर परिस्थिती पाहून केंद्रीय पथकाने पाहणी झाल्यानंतर तत्काळ काम सुरू केले असून, येत्या सात दिवसांत केंद्रीय पथकांचा अहवाल सादर होईल. अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
