कोल्हापूर : कर्णबधिर व्हायला लावणाऱ्या आवाजाच्या भिंती उभ्या करणे, रात्री – अपरात्री फटाके वाजवून लोकांची झोपमोड करणे, फ्लेक्स उभे करून गाव विद्रूप करणे, वादाला निमंत्रण देणारे स्टेटस लावणे अशा प्रकारामुळे गावगाड्यातील वादाला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने त्रस्त झालेल्या माणगाव ग्रामपंचायतीने यापुढे अशा प्रकारांना मज्जाव केला आहे.

आवाजाची भिंत, डिजिटल फलक उभारणी, फटाके वाजवण्यावर बंदी घालून सामाजिक सलोखा टिकवण्याचा निर्णय करणारी आचारसंहिता आज पासून अंमलात आणण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. इतक्यावर न थांबता अशी कृती करण्यास दंड आणि पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

हेही वाचा >>> VIDEO : धक्कादायक ! कोल्हापुरातील होमगार्डना मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक; शिवीगाळ केल्याचा आरोप

हातकणंगले तालुक्यातील माणगाव हे गाव राजर्षी शाहू महाराज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीमुळे आणि तेथे झालेल्या सामाजिक परिषदेमुळे नेहमी चर्चेत असते. अशा या गावांमध्ये अलीकडच्या काळात समाज माध्यमात स्टेटस लावण्यावरून दोन समाजामध्ये वादाच्या घटना घडल्या होत्या. शिवाय, गावात अलीकडे समाजाला त्रासदायक ठरणारे गैरप्रकार वाढीस लागल्याने त्याच्याही तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आज झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये या सर्व प्रकारची चर्चा करून गावातील सामाजिक सलोखा व ऐक्य शांतता निर्माण करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

हेही वाचा >>> इचलकरंजीतील प्रलंबित प्रश्‍नांवरुन महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिका प्रशासन धारेवर

निर्णय कोणते?

गावांमध्ये सर्वधर्मीय शांतता समिती स्थापन करून सूचनांचे पालन करणे. कोणत्याही कारणास्तव फ्लेक्स उभारणीस बंदी. आवाजाच्या भिंती, गाडीच्या पुंगळ्या काढून पळवण्यास बंदी. रस्त्यावर कोणत्याही प्रकारे शुभेच्छा संदेश लिहिण्यास बंदी. रात्री – अपरात्री रस्त्यावर फटाके वाजवण्यास बंदी. रात्री रस्त्यावर खेळ खेळण्यास बंदी. जयंती ,पुण्यतिथी, यात्रा, उरूस वेळी ग्रामपंचायत, पोलीस पाटील, पोलीस ठाण्याची परवानगी बंधनकारक. सामाजिक तेढ निर्माण होणारे स्टेटस, संदेश लावल्यास तात्काळ गुन्हा दाखल. चौकामध्ये धार्मिक झेंडे लावल्यास गुन्हा दाखल केला जाईल.

कारवाई कोणती ?

या नियमाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. त्याचा भंग केल्यास पाण्याचा नळ पुरवठा  एक वर्षाकरिता बंद करण्यात येईल. तसेच घरफळा आकारणीमध्ये पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. या ठराव्याच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय  पोलीस ठाण्याला पाठवल्या आहेत. या ठरावाचे सूचक अनिल जगदाळे, नंदकुमार शिंदे अनुमोदक अनिल पाटील, दादासाहेब वडर आहेत. ठरावावर सरपंच राजू मगदूम ,उपसरपंच ,ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत, अशी माहिती राजू मगदूम यांनी दिली.