कराड : पर्यावरणाचा समतोल राखत, गावातील प्रत्येक घराच्या छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा एक क्रांतिकारी निर्णय पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी घेतला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले ‘शंभर टक्के भूजलपुनर्भरण’ करणारे गाव म्हणून ओळख मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे.
दरवर्षी उन्हाळा आला की, पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागतात. मात्र, या संकटावर केवळ सरकारी मदतीची वाट न पाहता, लोकसहभागातून कशा प्रकारे कायमस्वरूपी मात करता येते, याचे आदर्श उदाहरण मान्याचीवाडीने घालून दिले आहे. निसर्गाकडून मिळणाऱ्या पाण्याचा योग्य साठा करून, मान्याचीवाडीने राज्यासमोर एक नवा वस्तूपाठ ठेवला आहे. गावकऱ्यांचा हा ‘पाणीदार’ निर्धार नक्कीच कौतुकास्पद अन् प्रेरणादायी आहे.
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’
वैशिष्टपूर्ण ग्राम म्हणून केंद्र व राज्य शासनाने गौरवलेली मान्याचीवाडी नेहमीच पर्यावरणपूरक उपक्रमांत अग्रेसर राहिली आहे. वृक्षलागवड आणि संवर्धनानंतर आता गावाने जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले आहे. दिवसेंदिवस खालावत चाललेली भूगर्भातील पाण्याची पातळी पाहता, गावाने ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही केवळ घोषणा न ठेवता तिचे चळवळीत रूपांतर केले आहे. यापूर्वी गावात वनराई बंधारे बांधणे, ओढा खोलीकरण, बंधाऱ्यांतील गाळ काढणे आणि ‘जलतार’सारखे प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. याच साखळीतील पुढचे पाऊल म्हणून आता घराघरांवर ‘भूजलपुनर्भरण’ (रेन वॉटर हार्वेस्टिंग) केले जात आहे.
‘तरच’ घराची नोंद होणार!
मान्याचीवाडीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेण्यात आला की, पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवायचा. या मोहिमेची गांभीर्यता इतकी आहे की, यापुढे गावात केवळ ‘भूजलपुनर्भरण’ करणाऱ्या घरांचीच नवीन नोंद ग्रामपंचायत दप्तरी केली जाईल, असा ऐतिहासिक ठराव करण्यात आला आहे. सध्या गावातील सर्व शासकीय इमारतींचे ‘भूजलपुनर्भरण’ पूर्ण झाले असून, घराघरांवर ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
सर्वच मिळकतींचा समावेश
सरपंच रवींद्र माने म्हणाले, मान्याचीवाडीत एकूण २१२ मिळकती असून, त्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ६ हजार चौरस फूट आहे. या सर्व छतांचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत गेल्यास दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी भूगर्भात साठवले जाईल. याशिवाय ५२ शेतकऱ्यांनी शेतात ‘जलतारा’ प्रकल्प उभारलेत. पाणीटंचाई हे केवळ संकट नसून, त्यावर मात करण्याचा आमचा हा सामूहिक प्रयत्न असल्याचा विश्वास माने यांनी दिला आहे.
