सांगली : मराठा समाजाचे दाखले रद्द झाल्याने जे गैरसमज पसरले आहेत याबाबत आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा झाली असून मी राजकीय अस्तित्व पणाला लावून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, जरांगे पाटील यांच्याशी मी बोललो आहे. त्यांना स्पष्ट पद्धतीने सांगितले आहे की कुठल्याही पद्धतीने मराठा समाजावर अन्याय होणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

आता मराठा समाजाचे दाखले रद्द झाल्यामुळे जे गैरसमज पसरले आहेत त्याबाबत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची ही चर्चा झाली आहे. त्यांना मी सांगितलं आहे माझं राजकीय अस्तित्व पणाला लावून यावर मार्ग काढू. खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य करून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे. आम्हाला खात्री आहे की योग्य तो न्याय मिळेल. परंतु न्यायालयाच्या बाहेर राहून अशा पद्धतीने निकाल आमच्याच बाजूला लागणार आहे हे वारंवार सांगून न्यायालयावर दबाव आणण्यासारखा प्रकार असून हा न्यायालयाचा अपमान आहे.

आमच्यावर गद्दार गद्दार म्हणून सातत्याने आरोप केले. त्याचा उपयोग काय झाला? महाराष्ट्रात ते सात नंबर वर गेले, महानगरपालिकेच्या निवडणुकीत सातव्या नंबरला, जिल्हा परिषद पंचायत समितीला सात नंबरला, विधानसभा निवडणुकीत मागे. मतदारांनी बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून स्वीकारला आहे हे मतदारांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. त्यांनी खरी गद्दारी २०१९ मध्ये केली होती. मतदारांनी महायुतीला मतदान दिले होते. पण गद्दारी करून ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले होते.

आदित्य ठाकरे यांनी कधीतरी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता बाहेर पडून रस्त्यावरील खड्डे भरतात की ते पण आता ऑनलाइन खड्डे भरणार आहेत हे पहावे लागेल. पालकमंत्री कोण होणार हे तीन नेते जाहीर करतात. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व सुनेत्रा पवार वहिनी. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी माझ्यासोबत चर्चा केली होती. त्याला मुर्त स्वरूप यावे आणि रायगडच्या पालकमंत्री पदी भरत गोगावले हेच विराजमान व्हावेत हीच आमची इच्छा आहे.