मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

कणेरीवाडीतील विनायक परशुराम गुदगे या युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने समाजमाध्यमात आरक्षणावरून आत्महत्या करत असल्याचे म्हटले

(संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून करवीर तालुक्यातील (जि. कोल्हापूर) एका तरुणाने आत्महत्या केली. कणेरीवाडीतील विनायक परशुराम गुदगे (२६) या युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने समाजमाध्यमात आरक्षणावरून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, तर पोलिसांनी मात्र नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून हा प्रकार झाल्याचे सांगितले. रविवारी दुपारी हा प्रकार घडला.

विनायकच्या आत्महत्येनंतर कोल्हापुरातील दसरा चौकात संतप्त कार्यकत्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोको आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही रस्त्यावर ठाण मांडले होते.

समजलेली माहिती अशी की, विनायक गुदगी याने कॉम्प्युटरचा डिप्लोमा केला होता. सरकारी नोकरीसाठी तो परीक्षा देत होता. मात्र अनेक परीक्षा देवूनही नोकरी मिळत नसल्याने तो नैराशात होता. कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाल्यापासून तो या आंदोलनात सक्रीय झाला होता.

विनायकने आज स्वयंपाकघरातील वाशाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ, शेजाऱ्यांनी विनायकला खासगी वाहनातून तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, विनायक या बेरोजगार तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती दसरा चौक येथील आंदोलकांना समजली. त्यामुळे मराठा महासंघाचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह राज्य राखीव दलाच्या जवानांच्या तुकड्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

‘विनायक हा दसरा चौक व कणेरीवाडी येथील आंदोलनात सहभागी झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या आत्महत्येला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये’, असे दिलीप देसाई यांनी पोलिसांना ठणकावले. तर पोलिसांनी शांततेची भूमिका घेत ‘विनायकचे कुटुंबीय जो जबाब देतील, त्यानुसार जबाब घेतला जाईल. जे सत्य असेल तेच जनतेसमोर येईल’, असे सांगितले. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना विनायकने आपली जीवनयात्रा संपवल्याने कोल्हापुरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maratha reservation kolhapur youth suicide unemployment