कराड : मराठा आरक्षणाचा प्रश्न, कुणबी दाखले आणि ‘सगे-सोयरे’ अधिसूचनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवत गुरुवारी कराड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला. कराड- चिपळूण मार्ग रोखून धरत तीव्र निदर्शने करण्यात आली.

मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर कराड-चिपळूण मार्गावरील मोक्याच्या पाटण तिकाटणे (वारुंजी फाटा) येथे मराठा आरक्षणाचे मागणीकर्ते आणि जरांगे पाटलांचे समर्थक एकत्रित येत सकाळी ११ वाजता अचानक ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात आले. हाती भगवे झेंडे घेतलेल्या आंदोलकांनी शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात एकच घोषणाबाजी केली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘सगे-सोयरे निकष लागू झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मराठा समाजाला वैधानिक आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील व शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी बंदोबस्ताचा कटाक्ष पाळला होता. मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आणि प्रशासनामार्फत राज्य सरकारला वेळप्रसंगी आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

निवेदनानंतर आंदोलन स्थगित

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा आंदोलन छेडत शासनाने मराठा समाजाच्या रास्त मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीबाबत सरकारने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर पुढील टप्प्यात संपूर्ण पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मागणी पूर्ण होईपर्यंत रोखून धरणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

प्रवाशांचे हाल; चोख बंदोबस्त

कराड- चिपळूण मार्गावरील मुख्य वाहतूक सुमारे तासभर पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी बस, मालवाहू वाहने व खासगी गाड्या खोळंबल्या. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वारुंजी फाटा परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.