मंगळवारचा ९ ऑगस्ट हाक्रांतिदिनाबरोबरच आंदोलनदिन ठरला. केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणास विरोध दर्शवत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता जनरल कामगार युनियन, आशा कर्मचारी महिला, महाराष्ट्र बांधकाम व्यवसाय कामगार संघटना, कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली.
कामगार कायदे मोडीत काढणाऱ्या सरकारच्या विरोधात देशभर विविध कामगार संघटनांच्या वतीने देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातही विविध कामगार संघटनांच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. मोदी सरकार चले जाव आंदोलनात मोठय़ा संख्येने कामगार सहभागी झाले होते.
संघटित कामगारांनी कार्यालयीन कामाची वेळ संपल्यावर निदर्शने केली, तर बांधकाम, आशा, ऊसतोडणी, शालेय पोषण आहार आदी कामगारांनी दसरा चौकातून मोर्चा काढला. उदय नारकर, प्रा. सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. निवेदन स्वीकारून अधिकाऱ्यांनी मागण्यांनुसार बठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
