राज्य सरकारने फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याने आडते-व्यापारी, हमाल-तोलाईदारांबरोबर बाजार समित्यांच्या संचालकांमध्येही असंतोष निर्माण झाला असून उद्या, सोमवारी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या आवाहनाला बाजार समिती संघाने पािठबा दिला आहे. त्यानुसार  कोल्हापूर हमाल पंचायत सहभागी होणार असून, उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे .

फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर फेरविचार करण्यासाठी उपसमिती स्थापन केली असून, या समितीच्या अहवालावर नियमनमुक्तीचा निर्णय होणार आहे, पण सरकार यावर ठाम असल्याने नियमनमुक्ती होणार आहे. त्यामुळे व्यापारी, आडते, हमाल, तोलाईदार यांच्यात घबराट पसरली आहे.

नियमनमुक्ती केली तर हे सर्व घटक अडचणीत येणार आहेत. यावर त्यांची उपजीविका असल्याने त्यांच्यामधून असंतोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोमवारच्या बंदमध्ये राज्यातील बाजार समित्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाने केले आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या वतीने सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे.