कोल्हापूर : इचलकरंजी येथील संग्राम चौकात तरुण विवाहितेचा खून झाल्याचा प्रकार सायंकाळी उघडकीस आला. पतीनेच गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक माहिती आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस अधिक शोध घेत आहेत. करिष्मा किसन गोसावी असे मृत महिलेचे नाव आहे. किसन गोसावी व करिष्मा गोसावी हे उभयता गेले काही दिवसापासून वरुटे इमारत येथे भाड्याने राहायला आहेत. किसन गोसावी हा भंगार गोळा करण्याचे काम करतो. पती-पत्नीमध्ये अलीकडे सातत्याने खटके उडत होते.

काल संध्याकाळपासून करिष्मा कोठे दिसत नव्हती. तिची दोन मुले मैत्रिणीकडे होती. मैत्रीण कालपासून का दिसत नाही याचा शोध घेण्यासाठी ती गोसावी यांचे घरी गेली.तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता करिष्मा मृतावस्थेत दिसली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू तासीलदार व सहकारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मारहाण करून पाय बांधलेल्या आणि चेहरा काळवंडलेल्या परिस्थितीत करिष्मा दिसून आली. तिचा गळा लावून खून केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. दरम्यान आज सकाळपासून पती किसन गोसावी हा बेपत्ता आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married woman killed by her husband in ichalkaranji kolhapur amy