सोलापूर : जंगलातील अथांग विश्वाला मराठी शब्दांचे वैभव बहाल करणारे थोर निसर्गलेखक, अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचा समृद्ध वैचारिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालया’चे उद्घाटन गुरुवारी (५ नोव्हेंबर) त्यांच्या जन्मदिनी झाले. या वेळी ग्रंथालयाच्या अधिकृत संकेतस्थळाचेही (वेबसाइट) लोकार्पण करण्यात आले. संदर्भग्रंथाच्या उदघाटनप्रसंगी अंबादास कनकट्टी यांनी विविध प्राणी व पक्ष्यांचे आवाज काढून अरण्यऋषींना आदरांजली वाहिली.
चित्तमपल्ली यांनी आयुष्यभर निसर्गाचा घेतलेला वेध, त्यांच्या नोंदी, विपुल साहित्य आणि दुर्मिळ देशी-विदेशी ग्रंथांचा ठेवा अभ्यासकांना सहज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी संकेतस्थळाचे लोकार्पण केले. पद्मश्री अरण्यऋषी दिवंगत मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर व ज्येष्ठ पक्षी अभ्यासक दिवंग डाँ. सालीम अली यांचा जन्मदिन १२ नोव्हेंबर, हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो. त्यादिनाच्या निमित्ताने अरण्यऋषी चितमपल्ली यांच्याकडील ग्रंथसंचित, त्यांची रोजनिशी यासह अनेक दुर्मिळ ग्रंथ वाचकांसाठी खुले करण्यात आले.
यावेळी बोलताना कवी भालेराव म्हणाले, ‘‘चित्तमपल्लींचे अखंड भ्रमण आणि संशोधनातून आकारास आलेला दुर्मिळ ग्रंथसंग्रह हा समाजासाठी अमूल्य ठेवा आहे. नव्या पिढीला निसर्गअभ्यासाची प्रेरणा मिळावी आणि पर्यावरण संशोधकांना हक्काचे दालन लाभावे, या दृष्टीने हे पाऊल ऐतिहासिक ठरले आहे.’’ या स्वप्नाची पूर्तता करणारे श्रीनिवास चित्तमपल्ली व श्रीकांत चित्तमपल्ली यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी चित्तमपल्ली यांचे संवर्धनविषयक विचार विविध माध्यमांतून जनमानसात जिवंत ठेवण्यावर भर दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात वनराई फुलवून चित्तमपल्ली यांच्या स्मृती चिरंतन जपण्याचा संकल्प कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी बोलून दाखवला, तसेच निसर्गप्रेमींनी व्यापक वृक्षारोपण व संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुहास पुजारी यांनी चित्तमपल्ली यांच्या भाषासमृद्धीतील योगदानाचा पट उलगडला. ‘‘पक्षिशास्त्र आणि प्राणीशास्त्रातील लॅटिन व इंग्रजी संज्ञांना अर्थवाही मराठी प्रतिशब्द देण्याचे अत्यंत मौलिक कार्य चित्तमपल्लींनी केले.
माडिया गोंड, पारधी यांसारख्या वनवासी समाजाच्या सहवासातून त्यांनी बोलीभाषेतील अस्सल देशी निसर्गसंज्ञा टिपून मुख्य प्रवाहातील मराठीत रूढ केल्या आणि भाषेचे दालन समृद्ध केले,’’ असे पुजारी यांनी नमूद केले. या वेळी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, विमलताई माळी, डॉ. शिवरत्न शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. विजयकुमार भोसले यांनी ग्रंथालयासाठी २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. व्यासपीठावर विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे, वनपरीक्षेत्र अधिकारी गुरुदत्त दाभाडे, राजकुमार हंचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तडवळकर यांनी केले, तर शतावरी चित्तमपल्ली यांनी आभार मानले. आयोजन यशस्वी करण्यासाठी संजय जोगीपेठकर, श्रद्धानंद नरवणे, राजू कोळी, गजानन होनराव, दशरथ वडतीले आदींनी विशेष प्रयत्न केले.
