कोल्हापूर : कोल्हापुरात झपाट्याने होत असलेल्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा पाहता रुग्णांना गंभीर आजारासाठी मुंबई, पुणेसारख्या महानगरात जाण्याची वेळ येणार नाही. वैद्यकीय सुविधा दर्जेदार मिळू लागल्या असल्याने येथे परदेशी रुग्ण येऊन कोल्हापूर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
छत्रपती राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय यांच्यावतीने शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या ११०० खाट क्षमतेच्या छत्रपती शाहू आरोग्य संकुलाचा पहिल्या मजल्याचा स्लॅब शुभारंभ व सीपीआर रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभ आज आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाप्रमाणे राज्यात १० वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली असून तेथे यावर्षी एक हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या महाविद्यालयात पायाभूत सुविधांसाठी लाडकी बहीण योजनेमुळे निधीची अडचण असली तरी एशियन बँक, जपान जायका यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल.
पाया आणि कळस
चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी रुग्णसेवा योग्य दर्जाची नसेल तर जनता, नागरिकांत नाराजी निर्माण होते. त्यामुळे या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. कोल्हापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापूरच्या वैद्यकीय सेवेचा पाया रचला तर हसन मुश्रीफ त्याचा कळस झाले आहेत, असे गौरवोद्गार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, डॉ. सत्यवान मोरे, डॉ. सुप्रिया देशमुख आदी उपस्थित होते.