कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर पुढील आठवडय़ात मंत्रालयात संयुक्त बैठ्क घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिली. जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची रविवारी भेट घेतली. जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे आणि हा स्टुडिओ कलाकारांसाठी खुला झाला पाहिजे यासाठी जयप्रभा स्टुडिओसमोर गेले सात दिवस आंदोलन सुरू आहे, याकडे त्यांनी पाटील यांचे लक्ष वेधले. जयप्रभाची जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याबरोबरच चित्रपट महामंडळ किंवा कोल्हापूर चित्रनगरीकडे ती वर्ग करा, अशी मागणी करण्यात येत आहे.



