परिसरात तणाव; महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री साडे दहा वाजता फुटला. या दुर्घटनेत परिसरातील चार गावातील शेकडो हेक्टरवरील पिके, जनावरे, वाहनेही वाहून गेली आहेत. तसेच या घटनेत वाहून गेलेली एक महिला आज मृतावस्थेत आढळून आली. जीजाबाई मोहिते (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत वाहून गेलेला मुलगा बचावला आहे.

केवळ अडीच तासांत या तलावातील पाणी वाहून जाऊन तलाव रिकामा झाला आहे. आज नुकसानीचा आढावा घेण्यात आणि दुरुस्तीच्या कामात लोक व्यग्र होते. दरम्यान या तलावाला गळती असल्याचे अनेकदा सांगितले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने यातून झालेल्या नुकसानीबाबत शेतक ऱ्यांमधून चीड व्यक्त केली जात आहे.

भुदरगड तालुक्यातील मेघोली परिसरात हा तलाव आहे.  बुधवारी रात्री १० वाजता सुमारास या भागातून वाहणाऱ्या ओढय़ाला मोठय़ा प्रमाणात पाणी वाढल्यामुळे ग्रामस्थांना तलाव फुटला असल्याची शंका आली. ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती देत ५ गावांना सतर्क केले. मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि अंधारात नुकसानीची कल्पना आली. सकाळी या या पाण्याने केलेल्या नुकसानीचा अंदाज आला. परिसरातील चार गावातील  शेकडो हेक्टरवरील पिके, जनावरे, वाहनेही या पाण्यामुळे वाहून गेली आहेत. झाडेझुडपे, माती दगड, गोटे वाहून येऊन ओढय़ाकाठच्या पिकांत येऊन पडल्याने शेकडो एकर शेती उद्ध्वस्त झाली. तलावाची सुमारे ५० मीटरची भिंत वाहून गेली आहे. पाण्याच्या या लोंढय़ात जीजाबाई मोहिते या त्यांच्या मुलासह वाहून गेल्या होत्या. सकाळी यापैकी मुलगा जिवंत आढळला तर जीजाबाई यांचा मृतदेह सापडला. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अश्विनी अडसुळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

शेतकरी, शेतकरी नेते संतापले

मेघोली तलाव दुर्घटनेवर शेतकरी व शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला. राजू शेट्टी म्हणाले, काही दिवसांपूर्वी एक धरण फुटले होते. एका नेत्याने हे धरण खेकडय़ांनी पोखरल्याने फुटल्याची अजब प्रतिक्रिया दिली होती. आता मेघोली तलाव नेमके खेकडय़ामुळे फुटले की बेडकांमुळे याबाबत सरकारकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, याबाबत वाट पाहणार आहोत.

गळती बेदखल

१९९६ साली या तलावाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली या तलावात प्रथम पाणीसाठा करण्यात आला. ९८ दलघफू पाणीसाठा केला जात होता. या तलावाच्या कामासाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रुपये खर्च झाले. सुरुवातीपासूनच या तलावात गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती.