सातारा : सध्या प्रचंड उन्हाळा सुरू असून या दिवसांत म्हसवड शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. दहा ते बारा दिवसातून एकवेळा पालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने शहरवासीयांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू आहेत. या भीषण टंचाईमुळे म्हसवडकरांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
माण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या म्हसवड शहरातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ ते दहाबारा दिवसाआड विभागवार पाणीपुरवठा केला जात आहे. नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने सुधारित नळपाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी दिला असला तरी या योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. म्हसवडच्या नवीन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात २४ बाय ७ योजनेचे पाणी नागरिकांना कधी मिळणार? हा प्रश्न कायमच पडतो. ही नवीन सुधारित पाणी योजना ती लवकरच कार्यान्वित होणार असली तरी ही योजना कासवगतीने सुरू आहे. सध्या या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तरी योजना लवकर सुरू करून पालिका प्रशासनाने म्हसवडवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.म्हसवड पालिकेची नवीन पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराची पाणीटंचाईची समस्या निश्चितच संपुष्टात येईल.- डॉ. सचिन माने मुख्याधिकारी
