कराड : मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थिती, जागतिकस्तरावरील तणाव आणि त्यामुळे आयात- निर्यातीचे बिघडलेले गणित याच्या अर्थझळांत मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्नही होरपळून निघणार आहे.
या प्रतिकूल परिस्थितीत बांधकाम साहित्यांच्या किमती भडकल्याने बांधकाम खर्च आपसूक वाढला आहे. बांधकाम साहित्यांच्या किंमतींवरील नियंत्रण सुटल्यास तसेच जागतिक कच्च्या मालाच्या किमती वाढतच राहिल्यास सर्वसामान्यांना घर खरेदी करणे वा बांधणे मुश्कील होणार आहे. की, ज्यामुळे रिअल इस्टेटमधील (स्थावर मिळकत) गुंतवणुकीचा वेग अगदीच मंदावेल, अशी चिंता बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
सध्या बांधकामाच्या स्टीलचा दर १५ टक्क्यांहून अधिकचा वाढला आहे. पीव्हीसी पाईप्स, टाइल्स, सॅनिटरी वस्तू, बाथरूम व किचन फिटिंग्ज, अॅल्युमिनियम खिडक्या, इलेक्ट्रिकल फिटिंग्ज यांच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत प्रचंड वाढ झाली असल्याचे राष्ट्रीय गृहनिर्माण विकास परिषदेचे (नरेडको) कराड शाखेचे अध्यक्ष अरविंद खबाले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हे बांधकाम साहित्यच नव्हे, तर मजुरांच्या भेडसावणाऱ्या कमतरतेमुळे मजुरीचे दरही वाढले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थिमुळे एकूण बांधकाम खर्च २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाढीव खर्चाचा हा संपूर्ण भार विकासकांना पेलणे आता कठीण झाले असून, त्याचा परिणाम म्हणून येत्या काळात फ्लॅट (सदनिका), शॉप (दुकान गाळे) तसेच व्यावसायिक बांधकाम यांच्या विक्रीत अतिरिक्त बांधकाम खर्चाच्या तुलनेत वाढ होणे स्वाभाविक असल्याचे अरविंद खबाले म्हणाले.
जर ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास फ्लॅट व अन्य बांधकामांची दरवाढ अटळ असून, याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय ग्राहकांना बसणार आहे. त्यांचे घर बांधणी किंवा खरेदीचा खर्च कोलमडण्याची चिंता असल्याचेही खबाले नमूद केले.
रिअल इस्टेटमधील जाणकारांच्या मते बांधकाम साहित्याच्या किंमतीवरील नियंत्रण सुटल्यास आणि जागतिक कच्च्या मालाच्या किमतींवरील वाढ कायम राहिल्यास घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर मोठा आर्थिक ताण येऊन, ज्यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा वेग मंदावत जाईल. या एकूणच परिस्थितीमुळे स्थावर मिळकत खरेदी, विक्री आणि बांधकाम क्षेत्रातील व्यवहार कमालीचे घटताना, या क्षेत्राला काही काळासाठी अवकळा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
