सोलापूर : पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीच्या रॅकेटचे धागेदोरे सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अकलूज येथील ‘हेमंत कॉर्पोरेशन’चा मालक हेमंत टेके याला अटक केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच त्याच्या अकलूज येथील गोदामावर कारवाई करत तब्बल ९६ हजार ७८० किलो दूधपावडर जप्त केली आहे. या पावडरची बाजारपेठेतील किंमत १ कोटी ३५ लाख ४६ हजार ८१ रुपये आहे.
तसेच, माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सोनू उर्फ चैतन्य घोरपडे याच्याकडे ५१ किलो दूधपावडर आणि ७ हजार लिटर दूध आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या या पावडरचे एकूण ११ नमुने अन्न व औषध प्रशासनाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती सोलापूरचे अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.
ठाण्यातील एक संशयित दूध भेसळीसाठी केमिकल पुरवत होता, तर अकलूजचा हेमंत टेके हा पावडरचा मुख्य पुरवठादार होता, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील त्या कारवाईनंतर स्पष्ट केले होते. मंचर पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
टेके हा दूधपावडरचा मोठा डीलर असून, त्याच्याकडे परवाना आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने माळेवाडी येथील गोदाम बंद करून अकलूजमधील एका मंगल कार्यालयामागे नवीन गोदाम सुरू केले होते. या गोदामात १० प्रकारच्या पावडरचा साठा होता. ही पावडर बॉडी बिल्डिंग, प्रोटीन वाढवण्यासाठी तसेच दुधातील ‘एसएनएफ’ वाढवून भेसळ करण्यासाठी वापरली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही पावडर खरोखरच भेसळयुक्त होती का, हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असेही देसाई यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दीड महिन्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. या कारवाईत दुधाचे ४०, तर दुग्धजन्य पदार्थांचे ३४, असे एकूण ७४ नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर दोषी नमुन्यांच्या प्रकरणात संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
