दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : कोल्हापुरात गुळाच्या गोडव्यात उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यातील वादामुळे कडवटपणा निर्माण झाला आहे. आधीच कोल्हापुरातील गुळाच्या प्रतिमेला दर्जावरून धक्का लागला असताना उत्पादक व व्यापारी यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. सौदे बंद पडू लागल्याने उलाढाल बंद पडण्याचे प्रकार वाढत असल्याने कोल्हापूरच्या गूळ बाजारपेठेचे अवमूल्यन होत चालले आहे. दसऱ्यापासून सौद्यांना गती येण्याची चिन्हे असताना आतापासूनच वाद रंगू लागल्याने हंगाम असाच संघर्षपूर्ण राहणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूरचा गूळ हा वैशिष्टय़पूर्ण म्हणून ओळखला जातो. भौगोलिक उपदर्जा (जीआय मानांकन) मिळाल्याने या गुळाचे वैशिष्टय़ जगभर अधोरेखित झाले आहे. जुने गूळ बांधणी करणारे हे त्यांच्या बांधणीमध्ये कमी लाल, तांबूस रंग बनवण्यामध्ये निपुण असतात. रंगात डावा असला तरी चवीच्या बाबतीत तो उजवा, सरस, आरोग्यदायी मानला जातो. स्वाभाविकच कोल्हापूरच्या गुळाला देश-विदेशातून मागणी वाढत आहे. त्याला अधिक पैसे मोजण्याची ग्राहकांची तयारी असते.

कोल्हापुरी गुळाच्या प्रतिमेला धक्का

अलीकडच्या काळात कोल्हापुरी गूळ नानाविध कारणाने बदनाम झाला आहे. शेजारच्या कर्नाटकात रसायनयुक्त आणि साखरमिश्रित गूळ सरसकट बनवला जातो. पिवळ्या रंगामुळे आणि अधिक गोडव्यामुळे तोच ग्राहकांना भावतो. कोल्हापुरी गूळ म्हणून तो परराज्यात विकला जातो. त्याची विक्री प्रामुख्याने सांगली मार्गे केली जाते. अशा पद्धतीने गूळ बनवण्यात अधिक आर्थिक फायदा आहे; हे लक्षात आल्यावर कोल्हापुरातील काही गुऱ्हाळघरांमध्ये साखरमिश्रित गूळ बनवला जात आहे.

गुळापेक्षा साखरेची किंमत असल्याने त्याची भेसळ करून अधिक कमाईचा स्वस्त मार्ग स्वीकारला गेला आहे. परिणामी अस्सल कोल्हापूर गुळाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. भौगोलिक उपदर्शनातील आदर्श निकषानुसार कोल्हापुरी गूळ मिळणे हे कठीण बनत चालले आहे. सेंद्रिय गूळ बनवल्याचा दावा करणारे अनेक जण आहेत, पण त्यातील सच्चेपणा तपासणे ग्राहकांना अडचणीचे बनत आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील गूळ उत्पादकांना भेसळ होत असल्याचा मुद्दा मान्य नाही. साखरेचे दर प्रतिकिलो चाळीस रुपयांच्या घरात गेले असताना साखर मिश्रित करून गूळ तयार करणे परवडत नाही, असा दावा शिवाजी पाटील या गूळ उत्पादक शेतकऱ्याने केला.

हंगामापूर्वी वाद

कोल्हापुरात दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वर्षांचे सौदे केले जातात. गुळाची आवक अगोदरपासूनच बाजारात व्हायला सुरुवात होते. दरवर्षी काही ना काही विघ्न निर्माण होत असतात. गतवर्षी हमाली दरवाढीवरून वाद उफाळला होता. गुळाचे सौदे बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दोन वर्षांपूर्वी व्यापारी व हमाल यांच्यातील भांडणामुळे उत्पादकांनी बाजार समितीला टाळे ठोकले होते. आता वजनाचा नवाच वाद निर्माण झाला आहे. गुळाची विक्री हल्ली आधुनिक पद्धतीने म्हणजे बॉक्सद्वारे केली जात आहे. बॉक्सचे वजन हा वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

उल्लेखित वजनापेक्षा गूळ कमी असल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्याने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. या कायद्याच्या कचाटय़ात सापडण्याची किरकोळ व्यापाऱ्यांची मानसिकता नाही. त्यांनी अडत्यांना गूळ आणि बॉक्स याचे वजन वेगळे नोंदवावे असे मागणी केली आहे.

आजच्या ग्राहककेंद्री बाजारपेठ आणि कायद्याला अनुसरून हा व्यवहार आहे. पण, गूळ उत्पादक सांगली व अन्य बाजारपेठप्रमाणे बॉक्सचे वजन नोंदवून खरेदी केली पाहिजे, असा आग्रह धरत आहेत. या मुद्दय़ावरून गूळ उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे.

मार्ग निघाला तरी..

गेल्या आठवडय़ात तीन वेळा गुळाचे सौदे बंद पडले. संतप्त गूळ उत्पादकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयावर वाहनांसह मोर्चा काढला. पालकमंत्री पाटील यांनी व्यापाऱ्यांना वजनाचा मुद्दा निकालात काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. पाठोपाठ सहकार विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समवेत गूळ उत्पादक व व्यापारी यांची बैठक होऊन बॉक्स वजनासह व्यवहार करण्याचा समाधानकारक तोडगा काढण्यात आल्याचा दावा केला.

दबावाखाली झालेला निर्णय व्यापाऱ्यांच्या पचनी पडणारा नव्हता. दुसऱ्या दिवशी पुन्हा ‘ये रे मागल्या’प्रमाणे व्यापाऱ्यांनी बॉक्सचे वजन गृहीत धरले जाणार नाही, असे सांगत सौदे बंद केल्याने वादाला तोंड फुटले.

अखेर बाजार समितीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी गुळाचे संपूर्ण वजन केले जावे, असा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना दिला असल्याने तूर्तास मतभेद आवरले आहेत. तरीही वारंवार वाद उफाळत असल्याने गूळ हंगाम यंदा वादातच पार पडणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूरच्या गुळाला मागणी आहे. बॉक्सचे वजन गूळ उत्पादन झाल्यापासून विक्री करेपर्यंत मॉश्चरमुळे वजन कमी होते. व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे प्रकार होतात. गूळ व्यापाऱ्यांनाही व्यापार करायचा आहे. व्यापारी अडवणूक करतात हा आरोप चुकीचा आहे. व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन समन्वयाने व्यवहार केले पाहिजेत,’–  निमिष वेद, गूळ व्यापारी