सांगली :  कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून, एक प्रकारचे पूर्वसंचित आहे. बुध्दी व मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपाने प्रकट होते. कला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना प्रोत्साहन, प्रतिभाशक्तीला वाव आणि सृजनशीलतेला व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  केले.

शांतिनिकेतन येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पुरस्काराचे मानकरी जी. एस. माजगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी, कला संचालक किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, महापालिका सभागृह नेते संदीप आवटी, नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, प्रदर्शन अधिकारी स्मिता किंकळे, प्रदर्शन समन्वयक विजय बोंदर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते ज्येष्ठ कलाकार जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत, त्यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले.  

राज्यभरातील या वर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून ३ हजार, ४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असून, त्यापैकी निवड समितीने उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे.

प्रदर्शनाची मांडणी एकूण आठ विभागात करण्यात आली असून, यामध्ये रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, कला शिक्षक प्रशिक्षण, कला व हस्त व्यवसाय (धातूकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकला, मातकाम), मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग या प्रत्येक विभागातून चार कलाकृतींची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली. तसेच शासकीय रेखाकला व बालचित्रकला स्पर्धेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.

कलाविड महाविद्यालय, शांतिनिकेतन आवार, सांगली येथे हे प्रदर्शन २२ फेब्रुवारीपर्यंत विनाशुल्क सुरू राहणार असून, याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.