कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वांगीण प्रगती आहे. जनमत पाहता केंद्रामध्ये पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर मंत्री शिंदे आले आहेत. इचलकरंजी येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे संघटनात्मक काम खूपच वाढले आहे. कार्यकर्त्यांची ऊर्जा बघितल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये निश्चितच आम्हाला यश मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात भानमतीचा प्रकार सुरूच
शासकीय योजनेचे लोकांना लाभ
कोल्हापूर जिल्ह्यासाठी पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. कार्यकर्त्यांबरोबरच समाजातील विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर भाजपने राबविलेले कार्यक्रम आणि विविध उपक्रमांनी जनतेच्या मनावर सखोल ठसा उमटल्याचे मला जाणवले. सद्यस्थितीत पक्ष संघटनात्मक बाबींवरच अधिक लक्ष घालण्यात येत आहे, असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा – विशाळगडावरील अतिक्रमणावरून राजकीय नेत्यांमध्येच जुंपली
अभिवादन आणि गोंधळ
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांचे इचलकरंजीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या पुतळ्याचे अनावरण आमच्या मातोश्रीने केले होते. त्यास अभिवादन करण्याची संधी मला मिळाली, असे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमल महाडिक यांच्यासह पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्याचे नियोजन होते. मात्र, ऐनवेळी क्रेन बंद पडल्याने नियोजनाचा बोजवारा उडाला. तर कार्यकर्त्यांच्या गर्दी, गोंधळामुळे कार्यक्रमात सतत व्यत्यय येत गेला.